परमार्थ साधणे हाच आपल्या जन्माचा खरा हेतू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


द्वैतामध्ये दुःख आहे, तर एकामध्ये सुख आणि आनंद आहे. आपण एकामध्ये राहिलो तर आनंद मिळेल. हे जगत् पुष्कळ भासले तरी ते एकच आहे. प्रपंचाच्या दहा दिशा आहेत, पण परमार्थाची मात्र एकच दिशा आहे; तिच्याकडे आपण लक्ष लावावे. काही न करणे, अर्थात् मनाने, हा खरा परमार्थ होय. परमार्थामध्ये उपाधी मुळीच नाही; नाही म्हणजे किती नाही, तर ‘मी’ सुद्धा तिथे नाही. प्रपंच हा द्वैत आहे, त्याचे अवडंबर मोठे असणारच. आपल्याला आपल्या जगण्याचा अंतिम हेतू जोपर्यंत कळला नाही, तोपर्यंत प्रपंच करणे हेच ध्येय आपण समजतो. वास्तविक, मनुष्यप्राणी हा देह आणि मन दोन्ही मिळून आहे, म्हणून त्याने ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही गोष्टी साधल्या पाहिजेत. परमार्थ साधणे हाच आपल्या जन्माचा खरा हेतू आहे. व्यवहारात द्वैताशिवाय आनंद नाही. म्हणून परमार्थात, मानसपूजेत, पहिल्याने ‘मी’ आणि ‘परमात्मा’ अशा द्वैताने सुरुवात करावी लागते.

जोपर्यंत परमार्थ आपल्या हाडीमासी खिळला नाही, तोपर्यंत आपल्याला वाचनाची गरज आहे. त्यापासून साधनाला जोर येतो. मन भगवंताकडे गुंतविण्यासाठी काय करावे हे पाहावे. एक बाप आपल्या मुलाला पोहायला शिकवीत होता. बापाने मुलाला पहिल्याप्रथम घोट्या‍इतक्या पाण्यात आणले, नंतर ढोपराइतक्या पाण्यात आणले, नंतर आणखी पुढे आणले; आणि एक दिवस त्याने मुलाला पाण्यात खेचून घेतले. त्याप्रमाणे आपले गुरू आपल्याला परमार्थ शिकवीत असतात. आपण पाण्यात उतरले मात्र पाहिजे. देहाने प्रपंच केला पण तो फळाला येत नाही, म्हणून संतांनी नामस्मरणाचा मार्ग सांगितला. पण आमचे शहाणपण, आमचा अभिमान, नाम घेण्याच्या आड येतो त्याला काय करावे ? हा अभिमान दुसरा कुणी उत्पन्न करतो असे थोडेच आहे ? आपल्या ध्यानातही येत नाही. इतके सूक्ष्म असे वासनेचे बीज आपल्यात कुठे तरी दडलेले असते. त्यामुळे लौकिकाची अभिलाषा सुटत नाही. याकरिता संतांनी एक मार्ग सुचविला आहे आणि तो म्हणजे नामस्मरणात राहून विषयाची ऊर्मी उठू न देणे, प्रपंचातली विघ्ने ही सूचनावजा असतात; ती आपल्याला जागे करतात. जन्माला आलो तो भगवंताला ओळखण्याकरिता, हे विसरू नये म्हणून विघ्नांची योजना असते. विघ्ने ही आपण भगवंताच्या जवळ जाण्याकरिताच येत असतात. तेव्हा त्यांना न घाबरता, भगवंताच्या नामांतच स्वतःला विसरून जावे, हाच परमार्थाचा सोपा मार्ग आहे.

जेथे आळस माजला, तेथे परमार्थ बुडाला.


Back to top button
Don`t copy text!