
स्थैर्य, 18 मार्च, सातारा : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी दिव्यांग लाभार्थ्यांनी वैश्विक ओळखपत्र (युडिआयडी कार्ड) काढणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व दिव्यांग लाभार्थी यांनी आपले युडीआयडी कार्ड आधार कार्डशी संलग्न करुन आवश्यक कागदपत्रे २५ मार्च २०२६ पूर्वी संजय गांधी शाखा तहसिल कार्यालय सातारा येथे जमा करावीत, असे आवाहन तहसिलदार समीर यादव यांनी केले आहे.
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थ सहाय्य रुपये 1500 वरुन रुपये 2500 इतके करण्यात आलेले आहे. तसेच २१ व २२ मार्च २०२६ रोजी कार्यालय सुरु रहाणार आहे. प्रत्येक दिव्यांग लाभार्थी यांनी त्यांचे आधार कार्ड युडिआयडी कार्डशी संलग्न करुन घ्यावे. सदर संलग्नीकरण झाले नाही तर पुढील महिन्यात पेन्शनचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे.
ज्या दिव्यांग लाभार्थी यांनी अंदयापही युडिआयडी कार्ड नाही त्यांनी त्याचे युडिआयडी कार्ड हे जिल्हा शासकीय रुग्णालय येथून प्राप्त करुन घ्यावे. निर्धारित मुदतीत युडीआयडी कार्ड व आधार कार्ड जमा न केल्यास पात्र लाभाथ्यांचे अनुदान बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना यांचा लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी.

