दैनिक स्थैर्य । दि. ०७ जून २०२२ । सातारा । पुणे–बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराडजवळील गोटे गावच्या हद्दीत आज पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास 22 प्रवासी असलेली ट्रव्हल्स पलटी झाली. चालकाचा ताबा सुटल्याने गाडी डिव्हायडरला धडकल्याने ट्रव्हल्स 15 ते 20 फूट फरफटत गेली होती. ट्रव्हल्स पलटी झाल्याचा मोठा आवाज आल्याने पहाटे लोकांची मोठी पळापळ उडाली.
मुंबईहून कोल्हापूरला प्रवाशी घेवून निघालेली ट्रव्हल्स (MH-09- EM- 4876) चा गोटे गावच्या हद्दीत अपघात झाला. ट्रव्हल्समधील 22 पैकी 8 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. यामध्ये विराज विठ्ठल शिंदे (वय- 24, रा. चिपळूण), दिलीप रतोबा जाधव (वय- 64, रा. कोल्हापूर), संजय श्रीमंत भोसले (वय- 42), सचिन श्रीमंत भोसले (वय- 37, दोघेही रा. सानपाडा), गजेंद्र मारूती भिसेल (वय- 35, रा. कोल्हापूर), तुकाराम महादेव पाटील (वय- 48, रा. मानखुर्द), अन्सारी असउद्दीन इल्लास (वय- 25, रा. नांदेड) तर अन्य एकजण अशी जखमींची नावे आहेत.
कराड जवळील हायवेवर असलेल्या हाॅटेल महेद्रा समोर सातारा ते कराड लेनवर हा अपघात झाला. यावेळी हायवे हेल्पलाइन पेट्रोलिंग इन्चार्ज दस्तगीर आगा, महेश होवाळ आणि कराड शहर पोलिस स्टेशनचे खालीक इनामदार, महामार्ग पोलिस स्टेशनचे श्री. लोखंडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना कराड शहरात उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. तसेच महामार्गावर खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.