दैनिक स्थैर्य । दि.३० जानेवारी २०२२ । सातारा । सातारा शहरात गत आठवड्यात एका खासगी सावकाराने एका छोट्या बाळास गहाण ठेवून घेतल्याच्या घटनेनंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली. त्यानंतर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्ह्यातील खासगी, अवैध सावकारी व्यवसाय करणार्यांविरुध्द कडक कायदेशीर कारवाईचे निर्देश दिले होते. सातारा पोलीस दलाने दि. 22 ते 28 जानेवारी या कालावधीत अवैध सावकारांविरुध्द धडक मोहीम सुरु असून आतापर्यंत या सहा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये 15 खासगी सावकारांनावर गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली.
याबाबत माहिती देताना बन्सल यांनी सांगितले की, जिल्ह्यात खासगी सावकारीविरुध्द विशेष मोहीम राबवून स्थानिक गुन्हे शाखा तसेच सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांना कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे जिल्हा पोलीस दलातर्फे 22 जानेवारी 2022 रोजी पासून 28 जानेवरी 2022 पर्यंत विशेष मोहिम राबवुन सातारा जिल्हयामध्ये अवैध सावकारी व्यवसाय करणार्या सावकारांविषयी गोपनीय माहिती प्राप्त करण्यात आली. त्यानंतर अवैध सावकारांच्या त्रासाला कंटाळलेल्या पीडीतांच्या तक्रारी घेवून महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 अंतर्गत एकूण 15 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यामध्ये शिरवळ पोलीस ठाण्यात एक, उंब्रज पोलीस ठाण्यात एक, कराड शहर पोलीस ठाण्यात एक, सातारा शहर पोलीस ठाण्यात दोन, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तीन, पाटण पोलीस ठाण्यात एक, वाई पोलीस ठाण्यात एक, शाहूपुरी पोलीस ठाण्यात एक, कोरेगाव पोलीस ठाण्यात दोन, वडूज पोलीस ठाण्यात एक, मेढा पोलीस ठाण्यात एक अशा एकूण 15 तक्रारी दाखल झाल्या असून या खासगी सावकारांविरुध्द महाराष् सावकारी अधिनियम 2014 चे कलम 39, 45 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यातील काहींना अटकही करण्यात आली असल्याचे बन्सल यांनी सांगितले.
नागरिकांनी तक्रारी देण्यास पुढे यावे : पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल
जिल्ह्यात सुरु करण्यात आलेली अवैध सावकारांवरील कारवाईची मोहिम यापुढे देखील सुरुच राहणार असून ज्या नागरिकांना बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करणारांकडून त्रास होत आहे. अशा तक्रारदारांनी संबंधित त्यांच्या हद्दीतील पोलीस ठाण्यात संबंधित सावकारांविरुध्द तक्रार दाखल करावी. अशांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जारी करण्यात आलेले असून तक्रारी दाखल झाल्यास अवैध सावकारी व्यवसायाचे समुळ उच्चाटण करता येईल, असे आवाहनही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी केले आहे.