स्थैर्य, सातारा, दि.१४ : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी येथील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकूल निवडणूक विभागाने ताब्यात घेतले आहे. या संकूलातील सिथेंटिक बास्केटबाॅल मैदानाच्या दरवाज्यास आज (गुरुवारी) कुलुप हाेते. निवडणुकीच्या कामासाठी आलेल्या पाेलिसांनी मैदानात प्रवेश केला. या कृत्यामुळे कुलुप ताेडणा-याचा शाेध घेऊन संबंधितावर कारवाई व्हावी अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींमधून व्यक्त हाेऊ लागली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामकाजासाठी निवडणूक विभागाच्या सूचनेनूसार छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलातील सर्व क्रीडा सुविधा उद्यापासून (ता. 14) ते 18 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांना काढला. त्यानूसार बुधवारी (ता.13) दुपारनंतर तसा फलक क्रीडा संकूलाच्या मुख्य प्रवेशदारावर लावला.
उद्या (ता. 15) ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी आज (गुरुवार) ग्रामपंचायत निवडणुकीची सर्व प्रक्रिया (मशिन पाठविणे, आदी) राबविण्यात येत आहे. मतदान झाल्यावर सर्व व्हीव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन संकुलातील गोडाऊनमध्ये ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर येथेच 18 जानेवारीला निकालाची प्रक्रिया सकाळपासून सुरू होणार केली जाणार आहे.
आज (गुरुवार) सकाळच्या प्रहरी नित्यनेमाने व्यायामासाठी येणा-या क्रीडापटूंना क्रीडा संकूल बंदची काेणतीच माहिती नव्हती. त्यामुळे माेठ्या संख्येने क्रीडापटू क्रीडा संकूलाच्या बाहेर जमले हाेते. क्रीडा संकूल बंदचा आदेश दुपारी आदेश लावल्याने आम्हांला कसे समजणार अशी त्यांचे म्हणणे हाेते. याच काळात काही अनाेळखी व्यक्तींनी निवडणुकीच्या कामासाठी आलेल्या पाेलिसांना क्रीडा संकूलातील सिथेंटिक मैदानावरील प्रवेशदाराचे कुलुप ताेडून आत प्रवेश दिला. याची माहिती क्रीडाप्रेमींनी बाहेर समजल्यावर या प्रकाराचा निषेध करण्यात आला.
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकूल हे केवळ खेळासाठीच वापरले जावे अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून क्रीडाप्रेमी करीत आहेत. त्याकडे जिल्हा क्रीडा संकूल समिती दुर्लक्ष करीत आहे. दरम्यान आजच्या (गुरुवार) कुलूप ताेडण्याच्या प्रकाराबाबत जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांच्याशी संपर्क साधला असता मी प्रवासात आहे. आपण सांगितलेला प्रकार नेमका काेणी केला याचा शाेध घेतला जाईल. त्यानंतर तुम्हांला माहिती देऊ असे नमूद केले.