
स्थैर्य, भुईंज, दि.१७: दहा दिवसांपूर्वी भुईंज ता.वाई येथील हॉटेल व्यवसायिक ओंकार चव्हाण यांचा लाथा, बुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण करत खून पुरावा नष्ट करण्यासाठी तो मृतदेह जाळला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने (एलसीबी) तिघांना गजाआड केले. यातील एक संशयित रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे.
जयेश उर्फ बंटी शामराव मोरे (वय 32), अक्षय संजीव जाधव (वय 21), वरुण समरसिंग जाधव (वय 23, सर्व रा.भुईंज ता.वाई) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, ओंकार चव्हाण हे हॉटेल व्यवसायिक आहेत. ते 12 दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झाल्यानंतर भुईंज पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली. एलसीबी पोलिस या घटनेचा तपास करत असताना त्यांना ओंकार यांचा घातपात झाल्याची माहिती मिळाली. त्यासंबंधी अधिक तपासाला सुरुवात करुन सुरुवातीला काही संशयितांना अटक केली. त्या संशयितांनी ओंकार चव्हाण यांचा खून केल्याची कबुली. खून केल्यानंतर मृतदेहाबाबत पोलिसांनी माहिती विचारल्यानंतर त्यांनी हादरवून सोडणारी माहिती दिली.
संशयित टोळक्याने ओंकार चव्हाण यांचे अपहरण केल्यानंतर नदीकाठी नेवून तेथे खून केला. या प्रकरणाची वाच्यता कुठेही होवू नये यासाठी मृतदेह स्मशानभूमीत जाळला. त्यानंतर संशयितांनी मृताच्या अस्थी नदीत टाकल्याची कबुली दिली. या टोळीमध्ये कोणाचा समावेेश होता व कोणी सल्ला दिला, यासंबंधीची माहिती संशयितांनी पोलिसांना दिली. संशयितांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसही थबकले. तोपर्यंत इतर संशयित आरोपी घटनेनंतर पसार झाले.
गेली दहा दिवस पोलिस संशयितांच्या मागावर होते. दि. 16 जानेवारी यातील तीन संशयित आरोपी साळमूख चौक, वेळापूर जि. सोलापूर येथे असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयितांना अटक केली. यावेळी संशयितांकडून पोलिसांनी एम एच 11 एडब्ल्यू 1476 ही कार देखील जप्त केली. संशयितांकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच यातील एकजण रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पोनि किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश गर्जे, पोलिस हवालदार संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, मुनीर मुल्ला, अमित सपकाळ, गणेश कापरे, रोजहत निकम, सचिन ससाणे यांनी कारवाईत सहभाग घेतला.