
संध्याकाळच्या उन्हाने सोनेरी झालेला आकाशाचा कडा, आणि त्या कड्यावर दूरवरून डोकावणारा एक गड – नाव आहे असीरगड. मध्यप्रदेशच्या सीमेलगत, जळगाव जिल्ह्याला लागून असलेला बुर्हाणपूरजवळचा हा गड म्हणजे केवळ एक किल्ला नाही. तो आहे शतकानुशतकांची साक्ष देणारा, पण विस्मृतीत हरवलेला इतिहासाचा एक धीरगंभीर दस्तऐवज. एकदा सुट्टीच्या निमित्ताने बुर्हाणपूरला गेलो होतो. परतीच्या वाटेवर, संध्याकाळी पाचच्या सुमारास, रस्त्याच्या कडेला एक लहानसा फाटा दिसला – ‘असरगढ किल्ला’. उत्सुकतेने डोळे विस्फारले गेले. थोडं पुढे जाताच तो गड नजरेला पडला. सूर्याच्या झळाळत्या किरणांत स्नान करत, विंध्य-सातपुडा डोंगररांगेत अंग चोरून बसलेला. घड्याळाकडे पाहिलं… आणि हळहळ वाटली. या गडासाठी एखादा संध्याकाळचा तास राखून ठेवायला हवा होता, मनात आलं. पण वेळेचं बंधन आणि जळगावला रात्रीपर्यंत पोहोचण्याची गरज – त्यामुळे गडाच्या पायथ्याशी थांबूनच पुढे निघालो.
इतिहासाच्या पावलांची घरघर…
असीरगड म्हणजे एका महायोद्ध्याच्या पावलांचा आरंभबिंदू. ‘छावा’ चित्रपटाची सुरुवात जिथून होते – छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा जिथं सुरू होते – तोच हा गड. त्याकाळच्या बलाढ्य सत्ताधीशांपुढं मराठ्यांच्या आक्रमकतेची झलक या गडावरूनच दाखवली गेली होती.
विंध्य आणि सातपुड्याच्या कुशीत विसावलेला असीरगड, भौगोलिकदृष्ट्या एक महत्वाची जागा. एकेकाळी इथूनच ‘दक्षिण पथ’ सुरू व्हायचा. दक्षिणेकडून दिल्लीकडे जाणारा हा एकमेव सुरक्षित मार्ग. त्यामुळे दिल्लीकडं वाटचाल करणार्या अनेक साम्राज्यांनी या गडाच्या पायथ्याशी आपली छावणी उभी केली होती.
अहीरांचं वैभव आणि अहिराणीची साक्ष…
इतिहास संशोधक सांगतात, असीरगड हे अहीर राजांचं राजधानीचं ठिकाण होतं. नंदा, वीरसेन, गोवाजी, लक्ष्मीदेव, कान्हदेव यांसारखे दूरदृष्टी शासक इथं होऊन गेले. गडाचं स्थान केवळ सामरिक नव्हे, तर व्यापारी दृष्टिकोनातूनही अत्यंत मोलाचं होतं. आज जळगाव, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांमध्ये ऐकू येणारी अहिराणी बोली – हीच ती परंपरेची ओळख. जिथे विशिष्ट बोली भाषा टिकून आहे, तिथं त्या समाजाच्या खोल मुळांची साक्ष मिळते. असीरगड आणि अहिराणी ही केवळ भाषा आणि जागा नाहीत – त्या एकमेकांशी जोडलेल्या अस्मितेच्या गाथा आहेत.
अश्वथामाचं सावट…?
महाभारताचा अजरामर योद्धा अश्वथामा – त्याच्याशी संबंधित एक दंतकथा आजही या गडावर जिवंत आहे. संध्याकाळच्या वेळेस, जेव्हा सगळं जग शांत होतं, तेव्हा कुणीतरी गडावर त्याच्या हालचाली पाहिल्याचा दावा करतो. पण अशा आख्यायिका गडाला एक वेगळंच रसरसतं रूप देतात. परवा आमचे स्नेही आणि आमचे वरिष्ठ अधिकारी डॉ. किरण मोघे यांच्या चिरंजीव समर यांनी धर्म नावाची अत्यंत दर्जेदार कादंबरी लिहली आहे. त्यात अश्वथामाचे पात्र आणि त्याच्या वाट्याला आलेले द्वापारयुगातील घटना कलीयुगात तो बोलून दाखवतोय… ते वाचताना मला तो असीदगडावर फिरतानाचा फील आला.
विस्मरणात गेलेली शौर्यगाथा…
असीरगडाने अनेक लढाया पाहिल्या. मुघलांच्या क्रूर कथा आणि मराठ्यांच्या शौर्याच्या गाथा – या सार्यांचे साक्षीदार असलेली ही वास्तू, आज शांत आहे. फारच कमी संशोधन, दुर्लक्षित पर्यटन, आणि इतिहासाच्या पायथ्याशी पडलेली विस्मृतीची सावली – हे गडाचं आजचं वास्तव.
पुन्हा भेटू…
पुन्हा कधी वेळ मिळाला, तर गडाच्या पायर्या चढून तटबंदीवर उभं राहायचंय. तिथून विंध्य-सातपुड्याच्या दरम्यानचा इतिहास डोळ्यांत साठवायचा आहे. डोळ्यांसमोरून जाणारी साम्राज्यं, दरबार, सैन्याच्या हालचाली, व्यापाराच्या गती… आणि हे सारं अनुभवताना हृदयात एकच भावना हे ठिकाण आपण विसरलो होतो कसं?
युवराज विनायकराव पाटील