माढा खासदारकीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? महायुती व महाविकास आघाडीच्या भूमिकेकडे लक्ष


दैनिक स्थैर्य | दि. २४ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
आगामी लोकसभा निवडणूक ही काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या असलेल्या महायुतीचे अधिकृत तिकीट कोणाला घोषित होणार, याकडे आता माढा लोकसभा मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. तर महाविकास आघाडीच्या अर्थात ज्येष्ठ नेते शरद पवार माढा लोकसभा निवडणुकीसाठी नक्की काय भूमिका घोषित करणार आहेत? हेही पाहण्यासारखे ठरणार आहे.

माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती ही सन २००९ साली झाली. त्यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माढा लोकसभा निवडणूक लढवली व बहुमताने निवडून आले. त्यानंतर सन २०१४ साली शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली विजयसिंह मोहिते – पाटील हे माढा लोकसभेवरून निवडून गेले होते. त्यानंतर २०१९ साली रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत माढा लोकसभेवर निवडून गेले आहेत. २०१९ साली माढा लोकसभा मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्यात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना यश मिळाले होते.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खासदार झाल्यापासून हजारो कोटींचा निधी हा त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघासाठी आणला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात त्यांनी शेकडो कोटींचा निधी दिला आहे. त्यामुळे खासदार रणजितसिंह यांनी सुद्धा आपली दावेदारी भक्कम केली आहे.

सन २०१९ साली लोकसभा निवडणुकीत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीमागे विजयसिंह मोहिते – पाटील यांची भक्कम साथ होती; परंतु आता ती परिस्थिती राहिली नाही. विजयसिंह मोहिते – पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते – पाटील हे आता माढा लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असून त्यांनी आगामी माढा लोकसभा आपण लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी माढा मतदारसंघात कोणाला तिकिट देणार, हे पाहण्यासारखे ठरेल.

– माढा लोकसभा मतदारसंघात असे आहेत आमदार –

१. माळशिरस – आमदार राम सातपुते – भारतीय जनता पार्टी
२. सांगोला – आमदार शहाजी पाटील – शिवसेना (एकनाथ शिंदे)
३. करमाळा – आमदार बबनदादा शिंदे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)
४. माढा – आमदार संजयमामा शिंदे – अपक्ष (अजित पवार यांना पाठिंबा)
५. माण – आमदार जयकुमार गोरे – भारतीय जनता पार्टी
६. फलटण – आमदार दीपक चव्हाण – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार)

माढा लोकसभा मतदारसंघात असणार्‍या फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार) चे आमदार दीपक चव्हाण आहेत. आमदार दीपक चव्हाण हे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत, तर माण तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे आमदार जयकुमार गोरे प्रतिनिधीत्व करीत आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये असणार्‍या माळशिरसचे आमदार राम सातपुते हे प्रतिनिधीत्व करीत आहेत; परंतु ते विजयसिंह मोहिते – पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत. आमदार शहाजी पाटील हे शिवसेना (एकनाथ शिंदे) सांगोला विधानसभेचे प्रतिनिधीत्व करत आहेत. करमाळाचे आमदार बबनदादा शिंदे व माढ्याचे आमदार संजय शिंदे हे राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत.

यामध्ये आमदार जयकुमार गोरे, आमदार शहाजी पाटील हे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत आहेत. आमदार बबन शिंदे व आमदार संजय शिंदे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार कार्यरत राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आमदार दीपक चव्हाण हे श्रीमंत रामराजे यांच्या नेतृत्वात कार्यरत असल्याने त्यांचा खासदार रणजितसिंह यांना जर तिकीट मिळाले तरी पाठिंबा मिळणार नाही. यासोबत आमदार राम सातपुते हे भारतीय जनता पार्टीचे कट्टर कार्यकर्ते असल्याने भारतीय जनता पार्टीचा आदेश ते अंतिम मानून कार्यरत राहणार आहेत; परंतु विजयसिंह मोहिते – पाटील यांचा गट हा खासदार रणजितसिंह यांचे कामकाज करणार नाही, अशी भूमिका त्यांचे निकटवर्तीय व्यक्त करीत आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी निवडणूक लढवणार असल्याचे घोषित केले आहे. सध्या राज्यामध्ये ओबीसी बांधवांचे जे आंदोलन पुकारले आहे, या आंदोलनामुळे ओबीसी समाज बांधव जे एकत्र झाले आहेत. त्यामुळे महादेव जानकर यांना याचा नक्की फायदा होईल. काही दिवसांपासून शरद पवार व महादेव जानकर यांच्यात सुद्धा चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जानकर सामील होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!