मनोज जरांगे-पाटलांनी पुकारलेल्या आंदोलनाला फलटण तालुक्यात मोठा प्रतिसाद; ठिकठिकाणी रास्ता रोको, वाहतूक ठप्प


दैनिक स्थैर्य | दि. २४ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
संघर्ष योद्धा क्रांतिसूर्य मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार आज मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या वतीने तालुक्यातील विविध ठिकाणी रास्ता रोको करीत राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवार्गातून आरक्षण देण्याची मागणी केली. दरम्यान, या रास्ता रोकोने तब्बल चार ते पाच किलोमीटरवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यानंतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले व कारवाईनंतर सोडून देण्यात आले.

आज फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर येथील चिंच बन येथे पुसेगाव व सातारा तसेच बाह्यमार्ग असलेल्या पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. तसेच बारामती मार्गावर सांगवी पूल येथे सांगवी, सोमंथळी, अलगुडेवाडी, सोनगाव, सस्तेवाडी येथील बांधवांनी रास्ता रोको करीत बारामती मार्ग ठप्प केला होता. खुंटे येथील पुलावर खुंटे, शिंदेवाडी, चौधरवाडी, गारपिरवाडी येथील बांधवांनी मार्ग रोखून धरला. होळ येथील मार्गवर होळ, जिंती, फडतरवाडी, भिलकटी येथील बांधवांनी मार्ग रोखत ‘एक मराठा कोटी मराठा’, घोषणांनी परिसर दणाणून सोडला. फलटण-लोणंद मार्गावर बडेखान येथे सुरवडी, साखरवाडी, काळज, निंभोरे, वडजल, काशीदवाडी, ढवळेवाडी, संगमनगर (नांदल) येथील तरुणांनी मार्ग रोखला.

दरम्यान, हा मुख्य मार्ग असल्याने येथे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. सातारा व पुणे या मार्गावर नीरा पूल, जुना टोलनाका येथे लोणंद, पाडेगाव, तरडगाव, सालपे, तांबवे, चव्हाणवाडी येथील मराठा बांधवांनी रास्ता रोको केला. त्यामुळे तब्बल दोन किलोमीटरवर वाहने उभी असल्याने लोणंद पोलिसांनी रास्ता रोको करणार्‍या आंदोलकांना ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर कारवाई करून सोडून देण्यात आले.

फलटण-आसू रस्त्यावर राजाळे येथे राजाळे, साठे फाटा, मठाचीवाडी, सरडे, धूळदेव येथील मराठा समाजाने मार्ग रोखून धरला होता. गोखळी पाटी येथे बारामती तसेच इंदापूरकडे जाणारा मार्ग ढवळेवाडी, पवारवाडी, तामखडा, हणमंतवाडी, गुणवरे, मुंजवडी, शिंदेनगर, जाधववाडी(आसू) या बांधवांनी रस्ता रोखून धरीत आरक्षणाची मागणी केली.

फलटण-शिखर शिंगणापूर मार्गावर सोनवडी बु. येथे नाईकबोमवाडी, तिरकवाडी, मिरढे, जावली, कोळकी येथील मराठा बांधवांनी मार्ग रोखला होता. फलटण-दहिवडी रस्त्यावर झिरपवाडी येथे भाडळी, निरगुडी, गिरवी, धुमाळवाडी, बोडकेवाडी, जाधववाडा, सासकल येथील मराठा समाजातील बांधवांनी रास्ता रोको केला. फलटण-पंढरपूर मार्गावर वाजेगाव, निंबळक येथे निंबळक, पिंप्रद, टाकळवाडे, विडणी, माझेरी, राजुरी, बरड, बागेवाडी, शेरेशिंदेवाडी, कुरवली बु. येथे मराठा बांधवांनी मार्ग रोखून धरला.

यावेळी प्रत्येक ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या वतीने एक एक समन्वयक यांनी सर्वांना एकत्र करीत हा रास्ता रोको यशस्वी केला. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. शांततेत हा रास्ता रोको पार पडला. यावेळी हजारो मराठा बांधव या रास्ता रोकोत सहभागी झाले होते.


Back to top button
Don`t copy text!