दैनिक स्थैर्य | दि. २७ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
महाराष्ट्र विधीमंडळात आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी फलटण ते पंढरपूर या रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाचा ५० टक्के आर्थिक वाटा देण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे फलटण ते पंढरपूर रेल्वे मार्गाच्या कामास गती मिळणार असून फलटण ते पंढरपूर रेल्वे लवकर सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही मंजुरी मिळाल्यामुळे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
फलटण ते पंढरपूर रेल्वे लवकर सुरू होण्याचे स्वप्न खासदार रणजितसिंह पाहिले असून त्यासाठी ते अहोरात्र प्रयत्नशील आहेत. अर्थसंकल्पात राज्य शासनाने या रेल्वे मार्गासाठी ५० टक्के आर्थिक वाटा उचलल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे खासदार रणजितसिंह यांनी आभार मानले आहेत.