
दैनिक स्थैर्य । 17 जुलै 2025 । सातारा । पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी देवराई संघटना अनेक ठिकाणी वृक्ष लागवड करून पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी प्रयत्न करते. या उपक्रमात आता जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीही सहभागी होणार आहेत.
देवराई व जिल्हा परिषद असा एकत्रित उपक्रम हाती घेतला असून, देवराईच्या वतीने विद्यार्थ्यांना बिया व पिशव्या देऊन त्याचे रोपण केले जाणार आहे. या उपक्रमासाठी देवराईचे प्रमुख आणि अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासमवेत आज मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्यात चर्चा झाली. येत्या काही दिवसांत या उपक्रमाला सुरुवात होणार आहे.
याप्रसंगी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, शिक्षणाधिकारी (योजना) शबनम मुजावर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने व इतर अधिकारी उपस्थित होते. झाडांची संख्या कमी झाल्याने पर्यावरणासह अनेक तापमानवाढ, पाऊस यासह अनेक घटकांवर परिणाम होत आहे. यासाठी देवराई संस्थेने एक पाऊल पुढे टाकले आहे.
यामध्ये देवराईच्या वतीने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा व माधमिक शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना बिया व पिशव्या दिल्या जाणार आहेत. या पिशव्यांमध्ये माती भरून त्यामध्ये विद्यार्थ्यांकडून बियांचे रोपण केले जाणार आहे. वर्षभरानंतर या मातीतून एखादे रोपटेबाहेर आल्यानंतर ते झाड देवराईस दान करावयाचे आहे.
शाळा किंवा घराच्या आवारात लावायचे आहे. या उपक्रमाबाबत सयाजी शिंदे व सीईओ यांच्यात प्राथमिक स्तरावर चर्चा झाली असून, येत्या काही दिवसांत या उपक्रमास सुरुवात होणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत एक लाख आठ हजार विद्यार्थी व माध्यमिक विभागात 50 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
असे एकूण एक लाख 60 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना बिया आणि पिशव्या दिल्या जाणार आहेत. या माध्यमातून किमान दीड लाख तरी रोपे तयार होतील, अशी अपेक्षा आहे.
देवराई व जिल्हा परिषद असा एक थांबविण्यासाठी वृक्ष लागवड करार केला जाणार असून, त्या माध्यमातून पर्यावरणीय उपक्रम राबविण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत हा उपक्रम सुरू होणार आहे.
-अनिस नायकवडी,शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग.