
स्थैर्य, फलटण, दि. २३ सप्टेंबर : राज्याच्या ग्रामीण राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला असून, या घोषणेमुळे फलटण तालुक्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.
एकीकडे निवडणुकीची अधिकृत घोषणा झालेली असताना, दुसरीकडे फलटण तालुक्यात दोन प्रमुख राजकीय गट अथवा नेते एकत्र येण्याच्या चर्चेने जोर धरला आहे. या संभाव्य युतीमुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या अनेक भावी सदस्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आपली उमेदवारी कोणत्या गटाकडून निश्चित होईल, या चिंतेमुळे अनेकांची अवस्था ‘ना घर का, ना घाट का’ अशी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम प्रसिद्ध केला जाणार आहे. यासाठी १ जुलै २०२५ रोजी अस्तित्व्यात असलेली विधानसभा मतदारसंघाची यादी आधारभूत मानली जाईल. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर हरकती व सूचना नोंदविण्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर २७ ऑक्टोबर रोजी अंतरिम मतदार यादी जाहीर केली जाईल.
मतदार यादीचा कार्यक्रम स्पष्ट होताच, संभाव्य उमेदवारांच्या निश्चितीसाठी राजकीय हालचालींना वेग येणार आहे. मात्र, फलटणमधील युतीच्या शक्यतेमुळे अंतिम उमेदवार कोण असतील, हे स्थानिक राजकीय समीकरणांवरच अवलंबून राहणार आहे.