स्थैर्य, फलटण दि. २ : गेली 25 वर्षे बंद असणारे झिरपवाडी ता. फलटण येथील ग्रामीण रूग्णालय त्वरीत सुरू करण्याचा आदेश उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी दिल्याच्या निर्णयाचे जनतेतून मोठ्या प्रमाणात स्वागत होत असून या रुग्णालयामुळे गोरगरीब, सर्वसामान्य रूग्णांना लाभ मिळेल, असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये व्यक्त केला.
सातारा येथे नुकत्याच पार पडलेल्या सातारा जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठकीत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या झिरपवाडी ग्रामीण रूग्णालयाचा प्रश्न उपस्थित करुन तसे पत्र उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांना दिले. त्यावेळी संबंधित अधिकार्यांना हे रूग्णालया सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश ना.पवार यांनी दिल्यामुळे हे रुग्णालय लवकरच सुरु होईल अशी अपेक्षाही दशरथ फुले यांनी व्यक्त केली.
झिरपवाडी येथील जुने ग्रामीण रूग्णालयाची ताबडतोब दुरूस्ती होऊन ही ग्रामीण रूग्णालयाची इमारत वापरात आणावी म्हणून गेली 25 वर्षे संघर्ष केला आहे. अखेर 25 वर्षानंतर या लढ्यास आज यश प्राप्त झाले आहे. नोव्हेंबर 1997 मध्ये तत्कालीन राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर यांना प्रत्यक्ष भेटून याबाबत निवेदन दिले होते. त्यावेळी त्यांनी तात्काळ ग्रामीण रूग्णालय सुरू करण्याचा आदेश दिला. त्यानंतर लगेचच हे ग्रामीण रूग्णालय सुरू झाले. परंतु दोन वर्षानंतर हे ग्रामीण रूग्णालय बंद पडले ते अखेर बंदच आहे. मधल्या 22 वर्षाच्या कालावधीमधे हे ग्रामीण रूग्णालय सुरू व्हावे यासाठी सतत प्रयत्न केले गेले परंतु फारसे यश मिळाले नाही. मार्च 2020 मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर सब्टेंबर 2020 मध्ये पुन्हा या ग्रामीण रुग्णालयासाठी आपण पाठपुरावा सुरु केला. पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, पालक मंत्री, आरोग्य सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाअधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आदी सर्वांकडे याबाबत पत्रव्यवहार केला. आता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी रुग्णालय सुरु करण्याच्यादृष्टीने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आपल्या पाठपुराव्याला नक्कीच यश मिळेल, असेही दशरथ फुले यांनी सांगितले.
झिरपवाडीचे ग्रामीण रूग्णालय सुरू व्हावे म्हणून वेळोवेळी फलटण तालुक्यातील पत्रकार मंडळीनी मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देऊन जनजागृती केली होती. त्यामुळे ग्रामीण रूग्णालय सुरू होणे कामी पत्रकारांचेही मोठे योगदान असल्याचे, दशरथ फुले यांनी आवर्जून नमूद केले आहे.