स्थैर्य, औंध, दि. 19 : देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे ही सातारा जिल्हा परिषदेची भूमिका आहे. वाटाणा सोयाबीन बियाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या वतीने प्रत्येक तालुक्यासाठी सहा लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही कुठेच मागे राहणार नाही असे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी केले.
जायगांव ता खटाव येथे बांधावर शेतकऱ्यांना बियाणे आणि खताचे वाटप करताना ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीच्या सभापती सौ रेखा घार्गे, माजी सभापती शिवाजीराव सर्वगोड, संदीप मांडवे विभागीय कृषी अधिकारी महेश झेंडे, तालुका कृषी अधिकारी अरुण जाधव, मंडळ कृषी अधिकारी सावंत, सरपंच सौ विजया देशमुख, रामदास देशमुख, किसन देशमुख, यशवंत देशमुख, नवनाथ पाटील, कृषी पर्यवेक्षक विजय वसव, सहाय्यक विलास काळे, श्रीकांत गोसावी लक्ष्मण देशमुख, संजय पाटील, जोतिराम देशमुख, सुरेश जठार यांची प्रमुख उपस्थिती होती.
विधाते म्हणाले कि मंडल कृषी विभाग आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने कोरोनाचा मुकाबला करताना शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. संसर्ग रोखण्यासाठी बांधावर बि बियाणे देण्याचा अभिनव उपक्रम राबवून शेतकऱ्यांच्या सेवा देण्याची भूमिका कौतुकास्पद आहे. असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
उपविभागीय कृषी अधिकारी महेश झेंडे म्हणाले खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कृषी विभाग शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. पुढील काळात शासनाच्या विविध योजना बचत गटामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यात येणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी गट तयार करावेत असे आवाहन त्यांनी केले..कृषी सहाय्यक विलास काळे यांनी प्रास्ताविक केले. रामदास देशमुख यांनी आभार मानले.यावेळी ज्योतिर्लिंग बचत गटाचे कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.