दैनिक स्थैर्य | दि. ९ मार्च २०२३ | फलटण |
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात जागतिक महिला दिनी (८ मार्च रोजी) फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांनी शिक्षण आयुक्तांनी जिल्हा परिषद शिक्षक बदलीचा काढलेला आदेश महिला शिक्षिकांवर अन्यायकारक ठरेल म्हणून हा निर्णय थांबवावा, अशी मागणी केली.
जागतिक महिला दिनी विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना आ. दीपक चव्हाण यांनी प्रथमत: सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले की, महिलांना नुसत्या शुभेच्छा देऊन चालणार नाही, तर महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे म्हटले.
पुढे बोलताना आ. चव्हाण म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या दुर्गम भागातील प्राथमिक शाळांमधील रिक्त जागा भरण्यासंदर्भात शिक्षण आयुक्तांनी २८ फेब्रुवारी २०२३ ला एक पत्र काढून जिल्हा परिषद बदली टप्पा क्रमांक ६ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यामुळे महिला शिक्षिकांच्या बदल्या दुर्गम भागातील शाळांवर होतील. महिला शिक्षिकांना अशा दुर्गम भागात काम करताना किती अवघड असते, हे सर्वांना माहीत आहे. महिला शिक्षिकांना दुर्गम भागात जाण्यास किती त्रास होतो. त्यामुळे दुर्गम भागात बदली झाल्यास महिला शिक्षिकांवर अन्याय होईल. तसेच याबाबत १५ फेब्रुवारीला २०१८ ला शासनाचा जी.आर. आहे की, महिला शिक्षिकांना दुर्गम भागात पदस्थापना देऊ नये. म्हणून शिक्षण आयुक्तांनी जिल्हा परिषद बदली टप्पा क्र. ६ चा निर्णय थांबवावा, अशी मी जागतिक महिला दिनी शासनाकडे मागणी करत आहे.