
स्थैर्य, फलटण, दि. २४ सप्टेंबर : तालुक्यातील तावडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या रुद्रप्रताप रोहिणी रणजित निंबाळकर या गुणवंत विद्यार्थ्याची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) अभ्यास सहलीसाठी निवड झाली आहे. भारत टॅलेंट सर्च (BTS) या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षेत मिळवलेल्या यशाच्या जोरावर त्याला हा बहुमान मिळाला आहे.
रुद्रप्रताप निंबाळकर हा इयत्ता पहिलीपासून तावडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत आहे. गतवर्षी इयत्ता तिसरीत असताना त्याने भारत टॅलेंट सर्च या स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला होता. याच संस्थेमार्फत प्रत्येक इयत्तेतील पहिल्या तीन गुणवंत विद्यार्थ्यांना भारताची शान असलेल्या ‘इस्रो’ संस्थेची सहल घडवून आणली जाते. या स्तुत्य उपक्रमातून रुद्रप्रतापची या सहलीसाठी निवड झाली आहे.
एका जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याने मिळवलेल्या या उत्तुंग यशाबद्दल फलटण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संकपाळ, सर्व विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांनी रुद्रप्रतापचे अभिनंदन केले असून, त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या निवडीमुळे रुद्रप्रताप निंबाळकर याने तालुक्याच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.