दैनिक स्थैर्य | दि. ०४ नोव्हेंबर २०२१ | नागठाणे | नागठाणे (ता. सातारा) येथे ग्रामपंचायतीने बांधलेल्या गाळ्यांचे वाटप आरक्षणानुसार करावे अन्यथा, बेमुदत उपोषण करण्याचा इशारा नागठाणे जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सौ. भाग्यश्री संजय मोहिते यांनी सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नागठाणे ग्रामपंचायतीने तीन वर्षांपासून गाळ्यांचे बांधकाम केले असून ते काम पूर्ण झाले आहे. मात्र या गाळ्यांचे वाटप आरक्षणानुसार न करता सरसकट केले आहे. यामुळे आर्थिक दुर्बल घटकांना म्हणजेच ओ.बी.सी,गरीब मराठा शेतकरी समाज व मागासवर्गीय दलित समाज यांना त्याचा लाभ घेता आला नाही. एकूण 68 गाळे बांधून झाले असून गेल्या तीन वर्षांपासून लोकांकडून प्रत्येकी 3 लाख रुपयांप्रमाणे पैसे घेण्यात आले असून या गाळ्यांमध्ये सुमारे तीन कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. शासन नियमानुसार ओ.बी.सी,गरीब मराठा शेतकरी समाज, मागासवर्गीय दलित समाज व भटकी जमात यांना 50% आरक्षण मिळाले पाहिजे. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे आरक्षणानुसार गाळे वाटप होत नाही, तोपर्यंत गाळे सील करावेत व रीतसर शासन नियमानुसार गाळ्यांचे वाटप करावे. त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकांना न्याय मिळेल, असे न झाल्यास दि.22 नोव्हेंबर पासून सातारा जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.