दैनिक स्थैर्य । दि. ०५ जुलै २०२२ । सातारा । राज्यातील २५ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणार्या २८४ पंचायत समितींचा आरक्षण सोडत कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर करण्यात आला आहे.
अनुसुचित जाती (महिला), अनुसुचित जमाती (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता संबंधित जिल्हाधिकारी हे दि. ०७ जुलै २०२२ रोजी जाहिर करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी जिल्हाधिकारी हे आरक्षण व सोडत करणार आहेत तर पंचायत समितीसाठी तहसीलदार हे आरक्षण व सोडत जाहीर करणार आहेत.
सोडतीनंतर निवडणूक विभाग / निर्णायक गणनिहाय आरक्षणाची प्रारूप अधिसूचना दि. १५ जुलै २०२२ रोजी संबंधित जिल्हाधिकारी प्रकाशित करणार आहेत.
जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण निहाय आरक्षण निश्चितीबाबत दि. १५ जुलै २०२२ ते दि. २१ जुलै २०२२ पर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती दाखल कराव्यात.
आरक्षण व सोडतीचा अहवाल त्यासोबतच सोडतीवर प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांचा अभिप्राय राज्य निवडणूक आयोगाकडे दि. २५ जुलै २०२२ पर्यंत जिल्हाधिकारी हे सादर करणार आहेत.
आरक्षण अधिसुचनेवर प्राप्त हरकती व सुचनांवरील जिल्हाधिकारी यांचा अहवाल विचारात घेवून गट व गणाच्या आरक्षणाला दि. २९ जुलै २०२२ पर्यंत राज्य निवडणूक आयोग मान्यता देणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गण रचनेचे अंतिम आरक्षण दि. ०२ ऑगस्ट २०२२ रोजी शासन राजपत्रात प्रकाशित करण्यात येणार आहे.