स्थैर्य, औरंगाबाद, दि.४: ” मुलगा वंशाचा दिवा आहे तर मुलगी ही वंशाची पणती’ आहे. आज मुलगी जन्माला आली नाही तर उद्या ताई कोण होईल, आई होणार नाही. जर आई झाली नाही तर मनुष्य निर्मिती होणार नाही. तर माणूसकी उरणार नाही. यासाठी मुलीच्या जन्माचे स्वागत करा. भेद-भाव करु नका. हा संदेश देण्यासाठी खास दत्तवाडीतील जिल्हा परिषद शाळेने आगळा-वेगळा उपक्रम राबवत गावात जन्मलेल्या मुलीचे स्वागत करत गावभर साखर वाटण्याचा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाने जनजाग्रुती बरोबरच सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे.
आज विविध क्षेत्रात महिला आपले स्थान निर्माण करत आहेत. असे असले तरी महिलांवर होणारे अन्याय अत्याचार थांबलेले नाहीत. बालविवाह, हुंडापद्धती या समस्या कायम आहेत. याचा परिणाम मुलींच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या जन्मदरावरही होतो आहे. मुलांच्या तुलनेत आजही मुलींची संख्या कमी आहे. यामुळे स्त्री जन्माचे स्वागत व्हावे. यासाठी शहरापासून ९० किलोमीटर अंतरावर असलेल्या सोयगाव तालुक्यातील दत्तावाडी येथे असलेल्या जिल्हा परिषद शाळेने “स्त्री जन्माचे स्वागत’ उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत गावात मंगळवारी जन्मलेल्या नवजात बालिकेचा जन्मसोहळा साजरा करण्यात आला. शाळेच्या वतीने सर्व गावात साखर वाटण्यात आली. बालिकेला नवीन कपडे आणि आईला साडी चोळी देवून सत्कार करण्यात आला. मुलगी, स्त्री यांना सन्मान देण्याबरोबरच त्यांना एक व्यक्ती म्हणून आदर देणे तो आचरणात आणणे हे प्रत्येकाची जबाबदारी आहे. असे मुख्याध्यापक बापू बाविस्कर यांनी सांगितले. या जन्मसोहळ्यास शालेेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान लांडगे,सहशिक्षक गणेश बाविस्कर यांची उपस्थिती होती. स्त्री जन्माचे स्वागत हा संस्कार घरा घरातू रुजला पाहिजे. संपूर्ण समाजात जनजागृती होण्यासाठी सरुवात ही शाळेतून व्हायला हवी. प्राथमिक शिक्षणातून मुलांचे विचार पक्के होत असतात. उद्याचे भविष्य घडवण्याची जबाबदारी शाळा आणि शिक्षकांची देखील आहे. त्यामुळे मुलींच्या जन्माचे स्वागत व्हावे. त्यांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे याकरिता स्त्री जन्माचे स्वागत आम्ही गावात साखर वाटून करण्यास सुरुवात केली आहे.-बापू बाविस्कर मुख्याध्यापक दत्तावाडी जि.प.शाळा