दैनिक स्थैर्य | दि. ५ सप्टेंबर २०२४ | फलटण |
१ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजता अमावस्या नजीक असल्याने सर्वत्र काळोख दाटलेला असताना अल्टो कार (Mh12 TV 6197) ही सुरवडीवरून साखरवाडीकडे नीरा डाव्या कालव्यावरून जात असताना कॅनॉलमध्ये कोसळली. त्याचवेळी त्या ठिकाणाजवळ असलेल्या दोन युवकांनी नितीन जाधव व अभिजित खोमणे (रा. १५ नंबर फाटा, सुरवडी, ता. फलटण) यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी जीवाची परवा न करता कारमध्ये असलेल्या दोन महिलांना कॅनॉलच्या पाण्याबाहेर गाडीचे दरवाजे फोडून काढले आणि त्या दोघींचा जीव वाचवला.
रात्रीच्या वेळी दोघे युवक तेथे असल्याने कारमधील त्या महिलांचा जीव वाचला. जीवावर उदार होऊन त्या युवकांनी महिलांचे प्राण वाचवले. याबद्दल या दोन्ही युवकांचा सत्कार पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी आदेशित केल्याने पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या आदेशान्वये साखरवाडी दूरक्षेत्र या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर व पोलीस फौजदार हजारे तसेच पोलीस कॉन्स्टेबल शिंदे यांच्या उपस्थितीत सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे त्या युवकांचा सत्कार करण्यात आला.