युवकांनी मीडियासारख्या क्षेत्रात करिअर करून समाजाला योग्य दिशा द्या – डॉ. केशव साठ्ये

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑगस्ट २०२३ | फलटण |
आज मीडियासारख्या क्षेत्रात कित्येक कोटींची उलाढाल होत असून युवकांनी आपले करिअर तेथे घडवून समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य करावे व संधीचे सोने करावे, असे आवाहन पुणे येथील माध्यम तज्ञ डॉ. केशव साठ्ये यांनी फलटण येथील कार्यक्रमात केले.

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था केंद्र फलटण यांच्यातर्फे यावर्षीचा परशुराम पुरस्कार डॉ. केशव साठ्ये (पुणे) यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळेस मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. विक्रम आपटे, नाशिक केंद्राचे अध्यक्ष अ‍ॅड. अविनाश भिडे, श्याम जोशी (पुणे), सुभाष सबनीस (नाशिक) व केंद्रप्रमुख विजय ताथवडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

माझे बालपण फलटण येथे गेले असे सांगून डॉ. केशव साठ्ये यांनी सांगितले की, फलटण येथील झालेले संस्कार, आचार व विचार यामुळेच मी जीवनात यशस्वी होऊन उच्च ध्येय गाठू शकलो, याचा मला अभिमान आहे. यावेळी त्यांनी आपल्या माध्यम कार्यातून झालेल्या अनेक कार्याचा आढावा घेतला.

प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्ज्वलन करण्यात आले. सचिव अनिरुद्ध रानडे यांनी प्रास्ताविक करताना फलटण केंद्रातर्फे वर्षभर घेतल्या जाणार्‍या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी नाशिक केंद्राचे अध्यक्ष अ‍ॅड. अविनाश भिडे यांनी फलटण केंद्राचा उत्कृष्ट कार्याचा उल्लेख करून या केंद्राने स्वतःची इमारत उभी करावी तसेच युवकांसाठी कार्यक्रम राबवावेत, असे आवाहन केले. यावेळी डॉ. केशव साठ्ये यांना रोख ५००१ रुपये, स्मृतीचिन्ह, पगडी, शाल व प्रभू श्रीराम यांची प्रतिमा देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात प्रा. विक्रम आपटे यांनी सांगितले की, नोकरीनिमित्त मी फलटण येथे आलो व फलटणकर केव्हा झालो, हेच समजले नाही. फलटणची भूमी अनेक रूपाने प्रसिद्ध आहे. त्यांनी यावेळी स्वतःचा बंगला फलटण केंद्रास दान करीत असल्याचे घोषित केले. यावेळी सर्वांनी टाळ्यांच्या प्रचंड गजरात त्यांच्या घोषणेचे स्वागत केले.

प्रमुख पाहुण्यांची ओळख अ‍ॅड. विजय कुलकर्णी यांनी करून दिली, तर इतर उपस्थितांचा परिचय सचिन कुलकर्णी, धनंजय विष्णूप्रद, नंदकुमार केसकर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. माधुरी दाणी व निखिल केसकर यांनी केले. आभार केंद्रप्रमुख विजय ताथवडकर यांनी मानले. या कार्यक्रमास डॉ. प्रसाद जोशी, श्रीपाद विभूते यांच्यासह फलटण केंद्राचे सभासद, निमंत्रित तसेच नीरा व लोणंद केंद्राचे प्रमुख उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!