मातृभाषा रक्षणासाठी युवकांनी मिशन मोडवर काम करावे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची सूचना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ एप्रिल २०२२ । मुंबई ।  देशातील युवापिढी भारतीय भाषांपासून दुरावत आहे, हे दुर्दैवी आहे. इंग्रजी भाषेला महत्त्व देताना श्रेष्ठ साहित्य असलेल्या भारतीय भाषांना आपण महत्त्व दिले नाही तर भाषाही मरतील व संस्कृतीही टिकणार नाही. मात्र मातृभाषा रक्षणाचे कार्य युवकांनी हाती घेतले व ते मिशन मोडवर राबवले तर भाषांना उज्ज्वल भवितव्य लाभेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

पुणे येथील मराठी साहित्यप्रेमी युवकांनी सुरु केलेल्या मराठी साहित्य डॉट कॉम या संकेतस्थळाचे उद्घाटन राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी राजभवन येथे झाले त्यावेळी ते बोलत होते.

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषा अवश्य शिकावी, संस्कृत देखील शिकावी परंतु वापरात मराठी भाषा आणावी. मातृभाषा चांगली आली तर दुसऱ्या, तिसऱ्या भाषा शिकणे सोपे होते.

सध्या विद्यार्थ्यांचा ओढा इंग्रजी भाषेकडे अधिक आहे. त्यामुळे भाषा रक्षणासाठी काम करताना युवकांनी प्रवाहाविरुद्ध जाण्याची तयारी ठेवावी असे राज्यपालांनी सांगितले.

मराठी साहित्य जागतिक स्तरावर नेण्यासाठी तसेच युवा लेखक व कवींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी मराठी साहित्य संकेतस्थळ सुरु केले असल्याचे प्रवर्तक अक्षय पुंड यांनी सांगितले.

यावेळी संकेतस्थळाचे सहसंस्थापक अनमोल कुलकर्णी, गीतकार जगदीश खेबुडकर यांचे नातू पंकज खेबुडकर, हरिप्रिया, प्रसाद, अजित, श्रीराम, राधा व स्वप्नील हे उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!