तरुणांनी तृणधान्य शेतीकडे वळावे, स्टार्टअपसाठीही पुढाकार घ्यावा – राज्यपाल रमेश बैस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०१ मे २०२३ । ठाणे । भारताच्या नेतृत्वाखाली जगभर तृणधान्य म्हणजे श्री अन्नाला वेगळी ओळख मिळत आहे. महाराष्ट्रातील कृषि महाविद्यालयांमध्ये तृणधान्य/भरडधान्य म्हणजेच श्री अन्नावर मोठ्या प्रमाणावर संशोधन होत आहे. राज्यातील विविध विद्यापीठातून दरवर्षी हजारो युवक पदवी घेऊन बाहेर पडतात. या युवकांनी भरडधान्याच्या शेतीकडे वळावे. तसेच त्यावर आधारित स्टार्टअप सुरू केल्यास मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळेल, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या पश्चिम विभागीय कार्यालयाच्या वतीने आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त गावदेवी मैदानावर आयोजित इट राईट मिलेट मेळ्याचे उद्घाटन राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते झाले. यानिमित्त वॉकेथॉन व क्लिन स्ट्रिट हबचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, एफएसएसआयच्या विभागीय संचालक प्रिती चौधरी, उपसंचालक डॉ. के.यू. मेथेकर आदी उपस्थित होते. यावेळी उभारण्यात आलेल्या तृणधान्यावर आधारित खाद्य पदार्थांच्या स्टॉलला राज्यपाल महोदयांनी भेट देऊन पाहणी केली. अन्न व औषध प्रशासन विभाग, ठाणे महानगरपालिका, असोचाम आणि न्यूट्रीलाईट यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

राज्यपाल श्री.बैस म्हणाले की, केंद्र सरकार व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नाने संयुक्त राष्ट्र महासभेने सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. तृणधान्य हे एक महत्त्वपूर्ण खाद्य स्त्रोत आहे. पूर्वी तृणधान्य हे फक्त गरिबांचे अन्न मानले जात होते. मात्र, आता भविष्यात आहारातील महत्त्वाचा पदार्थ म्हणून तृणधान्याचा समावेश करण्याची वेळ आली आहे. तृणधान्य हे संतुलित व पोषण आहाराचे समृद्ध स्त्रोत आहे. भारतातील विविध प्रदेशातील ज्वारी, बाजरी, रागी, साम, कंगनी, चीना, कुटकी, कुट्टू हे श्री अन्नाचे अविभाज्य हिस्सा आहेत. भरड धान्याच्या माध्यमातून शेतकरी, महिला, तरुणांना आत्मनिर्भर करण्यास सहाय्य होणार आहे.

भारतासारख्या कृषि प्रधान देशात कमी पाण्यावर येणाऱ्या या भरडधान्याचे उत्पादन हे रसायनमुक्त शेतीमालाच्या उत्पादनासाठी मोठा आधार आहे. पर्यावरणातील बदलाच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी भरडधान्याचा उपयोग होईल. लहान शेतकऱ्यांना भरडधान्याच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी अनुदान देण्याची आवश्यकता आहे. तसेच उत्पादित झालेल्या मालावर प्रक्रिया, पॅकेजिंग व त्याच्या विक्रीची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात ज्या प्रमाणे पाणीपुरी महोत्सव, खिचडी महोत्सव, आंबा महोत्सव होतो त्याचप्रमाणे तृणधान्य/भरडधान्य महोत्सवाचे आयोजन व्हावे, असेही राज्यपाल महोदयांनी यावेळी सांगितले.

आमदार संजय केळकर यांनी ठाण्यामध्ये अशा प्रकारच्या कार्यक्रमास ठाणेकर नक्कीच प्रतिसाद देतात असे सांगून म्हणाले की, तृणधान्य वर्षानिमित्त पाच हजार वर्षे जुन्या संस्कृतीला पुन्हा आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू आहे. आहारात तृणधान्याच्या समावेशासाठी सुरू असलेल्या या चळवळी नक्कीच यश मिळेल, असे सांगितले.

श्रीमती चौधरी म्हणाल्या की, मुलांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तृणधान्याचा वापरासाठी सर्वांनी एकत्र यावे, यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. खाद्य सुरक्षेबरोबर पोषण सुरक्षाही महत्त्वाची आहे. आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त तृणधान्याच्या वेगवेगळ्या उपयोगांची माहिती होण्यास मदत होत आहे. सुदृढ भारत पोषणयुक्त भारत घडविण्यासाठी व मुलांच्या भविष्यासाठी तृणधान्याचे वापर वाढवायला हवा.

अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या संचालक (प्रशिक्षण) शुभप्रभा निष्टला यांनी स्वागत करून कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती दिली.

इट राईट मिलेट मेळ्यानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच या कार्यक्रमात सहभागी संस्थांचाही गौरव करण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!