तरुणांनी विवेकशील राहून प्रगती करावी – प्रोफेसर डॉ. प्रभाकर पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २१ मार्च २०२४ | फलटण |
आजच्या तरुणांनी संयम व सम्यक दृष्टिकोन ठेवून आणि स्वतःची, समाजाची व देशाची प्रगती करावी, असे प्रतिपादन मुधोजी महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रोफेसर डॉ. प्रभाकर पवार यांनी राजुरी, ता. फलटण येथे केले.

श्रीमंत शिवाजीराजे उद्यान महाविद्यालय व कृषी महाविद्यालय फलटण आणि राजुरी ग्रामपंचायत, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात प्रोफेसर डॉ. प्रभाकर पवार ‘तरुणांच्या पुढील आव्हाने’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षपदी प्राध्यापक एम. जे. शहा होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये प्रा. सागर तरटे, प्रा. एम. एस. बिचुकले उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. प्रभाकर पवार म्हणाले, आजच्या घडीला कधी नव्हे एवढी देशाची परिस्थिती अस्थिर व संक्रमण अवस्थेत आहे. प्रगतीच्या नावाखाली अधोगतीच निदर्शनास येत आहे. अशा परिस्थितीत तरुणांची मानसिक स्थिती ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी झाली आहे. अशा अवस्थेत तरुणांनी शिक्षण, आरोग्य, विवेक व सम्यक दृष्टिकोन ठेवून स्वतःला घडवताना निर्व्यसनी व आरोग्यपूर्ण ठेवून स्वतःचा, कुटुंबाचा व देशाचा विकास केला पाहिजे.विविध क्षेत्रात प्रगती करताना त्या क्षेत्राची मूलभूत माहिती घेऊन झोकून देऊन काम केले पाहिजे. मोबाईल व इंटरनेटचा सुयोग्य वापर करावा, पुस्तके वाचावीत, व्यायाम करावा, आपल्या आई-वडिलांबद्दल व थोरामोठ्यांबद्दल आदर ठेवून विकास करावा, असेही प्रो. डॉ.प्रभाकर पवार यांनी सांगितले.

अध्यक्षपदावरून बोलताना प्रा. एम. जे. शहा म्हणाले, युवक-युवतींनी चांगले, वाईट गोष्टींचा अभ्यास करून पाऊल टाकले पाहिजे. आपली फसवणूक होऊन जीवन उद्ध्वस्त होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे.

प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा. सागर तरटे यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्य स्वयंसेवक, स्वयंसेविका व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी प्रबोधनपर पथनाट्य सादर केले. सूत्रसंचालन कु. श्रेया गायकवाड यांनी केले तर आभार अथर्व देवकर यांनी मांडले.


Back to top button
Don`t copy text!