स्थैर्य, कोळकी दि.26 : फलटण तालुक्यातील 80 गावात ग्रामपंचायत निवडणूक होत असल्याने ग्रामीण भागात मावळत्या वर्षाला निरोप देताना यंदा अधिकच रंग भरणार असून उमेदवारांना आर्थिक झळ सोसावी लागेल असे दिसते.
कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या शक्यतेने रात्रीची संचारबंदी जाहीर झाली असली तरी रात्री अकरापर्यंत का असेना नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी युवा वर्गात जय्यत तयारी सुरू असून उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, कोळकी येथील हॉटेल व ढाबेचालकही 31 डिसेंबरसाठी सज्ज झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणे सुरू झाले आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत मावळत्या वर्षाला निरोप देण्यात अधिकच रंगत वाढणार आहे. उमेदवारांना मित्र वर्गाला खूष ठेवण्यासाठी आर्थिक झळ सोसून जेवू – खावू घालावे लागणार आहे. कोळकी परिसरात ढाब्यांच्या संख्येतही वाढ झाली असून व्यावसायिक स्पर्धा वाढली आहे. दरम्यान पोलिसांनी व दारूबंदी विभागाने नकली दारूचा सुळसुळाट थांबविण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे.
शेतात रंगणार पार्ट्या
नवीन वर्षाचे स्वागत व सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. निवडणूक मग ती कोणतीही असो मतदारांची खाण्यापिण्याची चंगळ व्हावी म्हणून गरीब बिचार्या बोकडाचा बळी जातो. युवकांच्या गटांनी शेतात, काहींनी मित्रांच्या रिकाम्या घरात, काहींनी शहरातील हॉटेलमध्ये न्यू इयर पार्ट्या आयोजित केल्या आहेत.