स्थैर्य, सातारा, दि. 2 : उरमोडी धरणाच्या जलशयामध्ये रविवारी दुपारी पोहायला गेलेला युवक बेपत्ता झाला आहे. रात्री उशीरापर्यंत त्याचा शोध सुरू होता. जितेंद्र माने (वय 51, रा. पंताचा गोट, सातारा) असे बेपत्ता झालेल्यांचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, रविवारी दुपारी ते दोन मित्रांसोबत उरमोडी धरणाच्या परिसरात फिरायला गेले होते. त्यावेळी ते पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते. पाण्यात पोहत असताना ते अचानक बुडाले. याबाबतची माहिती परिसरातील नागरिकांनी तालुका पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक देव, हवालदार दिपक बर्गे हे कर्मचार्यांसह तातडीने घटनास्थळी गेले. माने यांचा शोध घेण्यासाठी त्यांनी शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सच्या पथकाला बोलावले होते. या पथकांचा पाण्यामध्ये शोध सुरू होता. परंतु, माने यांचा शोध लागला नाही. रात्री अंधार पडल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली. आता सोमवारी या पथकाच्या सोबतीला महाबळेश्वर ट्रेकर्सची टिमही बोलावण्यात येणार आहे. तालुका पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्याची प्रक्रीया रात्री उशीरापर्यंत सुरू होती.