देश स्वतंत्र करण्यासाठी तरुणांनी रक्ताचे अर्ध्य दिले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ११ ऑगस्ट २०२२ । सातारा । स्वातंत्र्यपुर्व काळात स्वातंत्र्यासाठी पेटुन उठलेल्या देशभरातील सर्व थरांतील व सर्व प्रांतातील तरुणांनी इंग्रजांच्या गुलामगिरीतुन मुक्त करण्यासाठी रक्ताचे अर्ध्य दिले. त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहण्यासाठी म्हणुन सातारा जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजीत केलेला कार्यक्रम निश्चितपणे स्तुत्य आहे व अनुकरणीय आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षण तज्ञ प्राचार्य पुरुषोत्तम शेठ यांनी सातारा येथे बोलताना केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त आणि ऑगस्ट क्रांती दिनाच्या 80 व्या वर्षानिमित्त ज्येष्ठ नागरिक संघ सातारा यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांसाठी ओळख स्वातंत्र्यसैनिकांची हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी प्राचार्य पुरुषोत्तम शेठ बोलत होते.
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष श्रीमती वैदेही देव होत्या विचार मंचावर कार्यवाह विजय मांडके होते. प्राचार्य पुरुषोत्तम शेठ यांनी क्रांतिकारकांनी पाठीमागून गोळीबार केला नाही तर समोर येऊन ठोशास ठोसा दिला व इंग्रजांना सळो पळो करून सोडले हे आपल्या स्वातंत्र्य चळवळीचे व क्रांतिकारी चळवळीचे वैशिष्ट्य आहे असे सांगितले. यावेळी स्वातंत्र्य सैनिकांचे चिरंजीव असलेले विलास पाटील , शिरीष जंगम ,  विजय देशपांडे यांनी अनुक्रमे स्वातंत्र्यसैनिक बाबुराव पाटील , स्वातंत्र्यसैनिक बाबुराव जंगम गुरुजी आणि स्वातंत्र्यसैनिक ज.दी. देशपांडे यांच्याविषयीची माहिती सांगितली.  यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष भिकाजीराव सूर्यवंशी , तसेच सदस्य सौ सुजाता कानेटकर , सौ. सुधा घोडके , दिलीप इनामदार ,रमणलाल शहा ,कृष्णनाथ चव्हाण यांनी स्वातंत्र्य चळवळीच्या विषयी व स्वातंत्र्यसैनिकांच्या विषयी माहिती दिली.
सूत्रसंचालन व प्रास्ताविक करताना कार्यवाह विजय मांडके यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यामागची भूमिका विशद केली. आणि स्वातंत्र्य सैनिकांबद्दल नेहमीच  सर्वांनी कृतज्ञता बाळगली पाहिजे असे आवाहन करून आभार मानले.
कार्यक्रमास सह कार्यवाह अशोक कानेटकर ,  तसेच प्रदीप खामकर , रावखंडे , प्रकाश खटावकर आदी उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!