
स्थैर्य, सातारा, दि. 28 : जुन्या भांडणाच्या कारणावरून आत्याच्या मुलाने भरतगाव(ता.सातारा) येथे येऊन युवकास लोखंडी रॉडने मारहाण करण्याची घटना सकाळी घडली.या मारहाणीत अक्षय विलास शेडगे (वय.२८,रा.भरतगाव,ता.सातारा) हा जखमी झाला. बोरगाव पोलिसांनी या प्रकरणी सुधीर बाबुराव रावते (रा.इंदोली, ता.कराड) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ,दि. १६ मे रोजी अक्षय शेडगे हा त्याच्या आत्याला आणण्यासाठी इंदोली (ता.कराड) येथे गेला होता. त्यावेळी तेथे त्याचे भांडण झाले होते. सकाळी अक्षय शेडगे हा भरतगाव येथे घरात असताना आत्याचा मुलगा सुधीर रावते तेथे आला. यावेळी त्याने झालेल्या भांडणाचा राग मनात धरून अक्षय शेडगे याला लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याची आई भांडणे सोडविण्यासाठी मध्ये आली असता सुधीर रावते याने त्यांनाही धक्काबुक्की करत शिवीगाळ केली.मारहाणीत अक्षय शेडगे जखमी झाला.त्याने बोरगाव पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी सुधीर रावते विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हवालदार बाबा महाडिक करत आहेत.