
गेली १९ वर्षे काँग्रेसशी एकनिष्ठ राहून जनसेवेचे व्रत घेतलेले युवा नेतृत्व गंगाराम रणदिवे यांना बरड जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळावी, अशी जोरदार मागणी जोर धरू लागली आहे. मुंजवडीसह १० गावांमधील दांडगा जनसंपर्क हीच त्यांची जमेची बाजू ठरत आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 04 जानेवारी : फलटण तालुक्यातील राजकारणात काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बरड जिल्हा परिषद गटा’त आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. गेली १९ वर्षे काँग्रेस पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन निष्ठेने काम करणारे मुंजवडी गावचे युवा नेतृत्व आणि सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस गंगाराम अरुण रणदिवे यांना या गटातून उमेदवारी मिळावी, अशी मागणी आता थेट जनतेतून आणि युवा वर्गातून पुढे येत आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), जिल्हाध्यक्ष रणजितभैय्या देशमुख आणि तालुकाध्यक्ष महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांच्या नेतृत्वाखाली गंगाराम रणदिवे यांनी पक्षात सक्रिय योगदान दिले आहे. केवळ पद मिळवणे नव्हे, तर तळागाळातील कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवणे आणि सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात हक्काने धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
जनसंपर्काचे जाळे आणि आक्रमक बाणा
मुंजवडी, निंबळक, राजुरी, बरड, बागेवाडी, कुरवली, आंदरुड, जावली, मिरढे आणि वडले या गावांमधील युवा वर्ग आणि नागरिकांशी त्यांचा थेट आणि जिव्हाळ्याचा संपर्क आहे. जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी आवाज उठवणारा आणि सामाजिक चळवळीत अग्रेसर राहणारा कार्यकर्ता अशी त्यांची ख्याती आहे.
बरड गट हा काँग्रेसच्या विचारधारेचा बालेकिल्ला मानला जातो. या बालेकिल्ल्यात आता नव्या दमाच्या आणि १९ वर्षे पक्षाशी गद्दारी न करता एकनिष्ठ राहिलेल्या गंगाराम रणदिवे यांच्यासारख्या कार्यकर्त्याला संधी मिळावी, असा सूर उमटत आहे. त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि आक्रमक कार्यशैली पाहता, पक्षाने त्यांच्या उमेदवारीचा गांभीर्याने विचार करावा, अशी भावना स्थानिक मतदारांमधून व्यक्त होत आहे.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्ष निष्ठावंतांना संधी देणार का? आणि गंगाराम रणदिवे यांच्या रूपाने बरड गटाला नवे नेतृत्व मिळणार का? याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

