स्थैर्य, सातारा, दि. 13 : करोन लॉकडाऊनच्या काळातच इस्त्रीचे दुकान बंद झाल्यानंतर नोकरीच्या शोधात असलेल्या साताऱ्यातील एका तेवीस वर्षीय युवकाने नैराशेतून राहत्या घरी गळफास घऊन टमाथ्या केली. ऋषिकेश दत्तात्रय गहिने असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून या घटनेनंतर साताऱ्यात खळबळ उडाली आहे.
साताऱ्यातील यादोगोपाळ पेठेतील ऋषीकेश दत्तात्रय गहिने (वय 22, मूळ रा. कोंडवे, ता. सातारा) या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. एकुलत्या एक असणाऱ्या मुलाने आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर धुणे-भांडी करणाऱ्या आईने केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. दरम्यान, या युवकाने बेरोजगारीमुळे आत्महत्या केल्याची चर्चा असून पोलिस आत्महत्येच्या नेमक्या कारणाचा शोध घेत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, ऋषीकेश हा आईसोबत यादोगोपाळ पेठेत राहतो. त्याचे शिक्षण अकरावीपर्यंत झालेले आहे. वडिलांचे आजारपणामुळे निधन झालेले आहे. ऋषिकेशला बहीण असून तिचे लग्न झालेले आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने आई धुणे व भांडी धुवून कुटुंबाचा गाडा हाकत आहेे. ऋषिकेश काम शोधण्यासाठी प्रयत्नशील होता. अशातच अडीच महिन्यांपूर्वी लॉकडाऊन झाल्याने त्याला काम मिळण्याच्या आशा आणखी धुसर झाल्या. त्यातूनच त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा परिसरात सुरु होती.
ऋषिकेशची आई धुणी-भांडी करण्यासाठी परगावीही जातात. शनिवारी त्या परगावी गेल्या होत्या. इकडे ऋषिकेश एकटाच घरी होता. काम मिळत नसल्याने त्याला नैराश्य आले होते. त्याने घराचे दार बंद करुन घेतले. शनिवारी दिवसभर व रविवारी दुपारपर्यंत घर बंद होते. घरातून मोबाईल वाजल्याचा वारंवार आवाज येत होता. परिसरातील नागरिकांनी दार ठोठावून आवाज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद आला नाही.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. ऋषिकेशच्या आईने केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. या घटनेची नोंद शहर पोलिस ठाण्यात झाली असून ऋषिकेशच्या आत्महत्येचे नेमके कारण काय? याचा पोलिस शोध घेत आहेत.