दैनिक स्थैर्य । दि. ४ जुलै २०२१ । औंध । औंध येथील तीन महिलांना कुर्हाडीचा धाक दाखवून सोन्याचे दागिने लुटणार्यास औंध पोलिसांनी शिताफीने अटक केली. रविंद्र विठ्ठल जामकर वय 34 असे त्याचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी सोन्याचे दागिने व कुर्हाड असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. औंध पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबत औंध पोलीस स्टेशमधून मिळालेली अधिक माहिती अशी, येथील प्राथमिक शिक्षिका प्राजक्ता प्रमोद गुजर, त्यांच्या आई हेमलता, जाऊ प्रणोती गुजर या शुक्रवारी सायंकाळी औंध ते वरुड रस्त्यावर फिरायला गेल्या होत्या. सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास त्या औंध गावच्या दक्षिणेकडील पिराच्या मशिदीजवळ फिरून परत आल्यानंतर पाठीमागून एक दुचाकीस्वार आला व अंधाराचा फायदा घेऊन कुर्हाडीचा धाक दाखवत प्राजक्ता गुजर यांना कानफटीत मारून तुमच्या जवळ असणारे दागिने द्या, अन्यथा तुम्हाला कुर्हाडीने तोडून टाकीन, असा दम प्राजक्ता गुजर, त्यांची आई हेमलता व प्रणोती गुजर यांना दिला. त्यानंतर दोघींनीही घाबरून जाऊन गळयातील
मंगळसूत्र, जोंधळी सोन्याची माळ, हातातील अंगठी असा सुमारे 1 लाख 32 हजारांचा ऐवज त्याला दिला. या लुटमारीची माहिती औंध गावात पोलीस स्टेशनला समजताच सपोनि उत्तम भापकर व पोलीस कर्मचार्यांनी तातडीने कारवाई करत पथके तयार करून गावातील सीसीटीव्ही तपासणी करून संशयित रविंद्र विठ्ठल जामकर वय 34 यास ताब्यात घेत त्याची झाडाझडती घेतली. त्याच्याजवळ असणारे सोन्याचे दागिने, अंगठी, कुर्हाड जप्त केली व रविंद्र जामकर यास अटक केली.
दरम्यान याप्रकरणी रविंद्र जामकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेची नोंद औंध पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि उत्तम भापकर, पोलीस नाईक प्रशांत पाटील, किरण जाधव, कुंडलीक कटरे, पंकज भुजबळ, वाघ, यादव अधिक तपास करत आहेत.