स्थैर्य, सातारा, दि. 02 : जगभरात हाहाकार माजविलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आपल्या देशात वाढत असून त्याची पाऊले महाराष्ट्रात वेगाने पडतं आहेत. अशावेळी हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांचा रोजगार बंद झाला असून त्यांवर उपासमारीची वेळ आलेली दिसताच साम्राज्य प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष चिन्मय जंगम यांनी ” एक पाऊल गोरगरिबांसाठी ” आव्हान केले. या आव्हानामुळे सर्व साम्राज्य प्रतिष्ठान पदाधिकारी व सभासद जोमाने कार्य करु लागले व या उपक्रमातून मास्क वाटप, धान्य वाटप, तसेच पोलिसांचे आभार मानणारे उपक्रमांचा धडाका सातारा जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यांत सभासदांनी सुरू केला.
सोलापूर येथील माळशिरस मधील मोरोची गावात युवती सभासद प्राजक्ता काटे व दिशाली सोनमळे यांनी तर कचरेवाडी गावात मनीषा सरगर यांनी मास्क वाटप करून ‘ घरी रहा सुरक्षित रहा ‘ अशी जनजागृती देखील केली.
त्या पाठोपाठ कोरोनाविरुद्धच्या लढाईतील शौर्य व अभिमानास्पद कार्याचे चित्राच्या माध्यमातून वर्णन करून ते चित्र शाहूपुरी पोलिस ठाणे येथे वैदेही निकम, विकासनगर पोलिस ठाणे येथे सायली तारू, बोगदा परिसरात असलेले पोलिस बांधव यांस श्रद्धा कोळेकर, चाफळ पोलिस ठाणे येथे ऋतुजा चव्हाण तर महाबळेश्वर पोलिस ठाणे येथे वृषाली माळवदे यांनी तेथे कार्यरत असणारे पोलिस बंधू भगिनी यांस देऊन त्यांचे आभार मानले. तसेच भर उन्हात जनतेसाठी कार्यरत असणारे पोलिस बंधू भगिनींकरिता सातारा शहर सचिव कोमल मोरे यांनी मोफत लिंबू- पाणीची व्यवस्था करून त्यासाठी लागणारे साहित्य शाहूपुरी पोलिस ठाणेचे स.पो.नि.शितोळे व मेचकर यांकडे दिले.
या सर्व उपक्रमांबरोबर सातारा, वडूज व कोरेगाव या ठिकाणी गोरगरिब गरजूंना धान्य वाटप करण्यात आले. सातारा शहरामध्ये शहराध्यक्षा कोमल माने यांसह युवती सभासद नीलम बेलकर, पायल कदम, श्रुती पानसकर ,कोमल मोरे, केतकी सपकाळ , वैष्णवी जाधव, शैला जाधव यांनी ६० कुटुंबांना तांदूळ वाटप केले. यावेळी ऐक्य प्रेसचे व्यवस्थापक चिंचकर यांनी उपस्थिती देऊन सभासदांचे प्रोत्साहन वाढवून त्यांचे आभार मानले. सातारासह वडूजमध्ये प्राजक्ता रायबोले, शिवानी मराडे, हर्षदा गोडसे, प्रियांका मराडे यांनी ४० गोरगरिब कुटुंबीयांना वडूजमध्ये तांदूळ वाटप केले असून लवकरच कोरेगावमध्ये दिव्या वाघ, प्राजक्ता माने, करुणा काकडे, शिवकन्या बोराटे व ऋतुजा काळे धान्य वाटपाचा कार्यक्रम पार पाडणार आहेत, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष माननीय चिन्मय जंगम सर यांनी दिली तसेच यापुढे देखील साम्राज्य प्रतिष्ठान तर्फे सातारासह संपूर्ण महाराष्ट्रात असेच विविध उपक्रम राबविले जातील असे देखील सांगितले.हे सर्व उपक्रम प्रशासन नियमांचे पालन करूनच पार पाडावेत असे सूचना देखील चिन्मय जंगम यांनी व आतापर्यंत राबविलेल्या उपक्रमांसाठी सर्व पदाधिकारी व सभासदांचे आभार मानून त्यांस पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.