
दैनिक स्थैर्य । दि. ०७ जुलै २०२२ । सातारा । पुणे-बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गावर सातारा येथील मानस हॉटेल समोर भरधाव दुचाकी डिवाइडरला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात कराड येथील २३ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवार, दि.६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. शिवम राजेश काटवटे वय २३ रा, कराड असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिवम काटवटे हा कराड येथील वीज वितरण कार्यालयामध्ये विद्युत सहाय्यक म्हणून काम करत होता. त्याची पुण्याला परीक्षा होती. त्या परीक्षेसाठी तो दुचाकीवरून पुणे येथे गेला होता. बुधवारी दुपारी तो परीक्षा झाल्यानंतर पुण्यातून दुचाकीवरून घरी येण्यासाठी निघाला. सातारा शहराजवळ आल्यानंतर मानस हॉटेलनजीक भरधाव दुचाकी डीवाईडरला धडकली. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन शिवम या तरुणाला क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. या अपघाताची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.