
स्थैर्य, फलटण, दि. १७ ऑक्टोबर : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरडगाव गटातील राजकीय वातावरण तापू लागले असून, ‘शेतकऱ्याचं पोरगं’ अशी ओळख सांगत युवा उद्योजक महेश मधुकर सूळ यांनी राजे गटाकडे उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली आहे. गटाने संधी दिल्यास तरडगाव जिल्हा परिषद गटातून पूर्ण ताकदीने निवडणूक लढवण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी ‘स्थैर्य’शी बोलताना सांगितले. त्यांच्या या घोषणेमुळे गटातील युवक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महेश सूळ यांना घरातूनच सामाजिक आणि राजकीय कार्याचा वारसा लाभला आहे. त्यांचे वडील मधुकर सूळ हे माळेवाडी गावचे माजी सरपंच असून, सध्या तरडगाव विविध कार्यकारी सोसायटीचे विद्यमान संचालक म्हणून कार्यरत आहेत. या कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे महेश सूळ यांचा गावातील आणि परिसरातील नागरिकांशी दांडगा जनसंपर्क आहे. बी.टेक. पदवीधर असलेले महेश सूळ हे उच्चशिक्षित असून, गेल्या सात वर्षांपासून मशीनद्वारे ऊस तोडणीचा व्यवसाय करत आहेत. त्यामुळे त्यांना शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जवळून जाण आहे.
आपल्या उमेदवारीविषयी बोलताना महेश सूळ म्हणाले, “विधानपरिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह राजे गटातील सर्वच वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वात काम करण्याची माझी इच्छा आहे. गटाने माझ्यावर विश्वास दाखवून तरडगाव गटातून संधी दिल्यास, मी ही निवडणूक निश्चितच पूर्ण ताकदीने लढेन.”
“एक संधी विकासाला, एक संधी मेहनती माणसाला,” अशी साद घालत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “राजकीय वारसा किंवा पैसा नसलेल्या, गोरगरिबांच्या प्रश्नांची जाण असलेल्या एका सामान्य, अभ्यासू आणि चळवळीतील युवकाला जनसेवेची संधी मिळावी,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या भूमिकेमुळे तरडगाव गटातील युवक कार्यकर्ते त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रही झाले असून, त्यांच्या नावाची जोरदार मागणी होत आहे.
उच्चशिक्षित, तरुण उद्योजक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेला उमेदवार म्हणून महेश सूळ यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे राजे गटाच्या उमेदवारीच्या चर्चेत त्यांच्या नावाने नवी रंगत आली असून, आता गटाचे वरिष्ठ नेतृत्व काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण तरडगाव गटाचे लक्ष लागले आहे.