तरुण अभियंत्यांनी फलटणचा ऐतिहासिक वारसा जपावा : इंद्रजीत नागेशकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. 23 सप्टेंबर 2021 । फलटण । पौराणिक वास्तू आणि संस्कृती यांना आधुनिकतेची जोड देऊन त्यांना जतन व पुनर्जीवित केले पाहिजे. फलटण हे ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर आहे. हा वारसा कायमस्वरूपी जपण्याचे येथील तरुण अभियंत्यासमोर आव्हान असल्याचे, कोल्हापूर येथील प्रथितयश स्थापत्य अभियंता इंद्रजीत नागेशकर यांनी सांगीतले.

येथील फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय फलटणच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाने ’लायन्स क्लब ऑफ फलटण’ आणि ’बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, फलटण सेंटर’ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 17 सप्टेंबर 2021 रोजी ’अभियंता दिवस’ व ’विश्‍वकर्मा दिन’ साजरा केला. त्याप्रसंगी ‘‘पौराणिक वास्तू आणि त्यांचे जतन’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून इंद्रजीत नागेशकर बोलत होते. यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, लायन्स क्लबचे उपप्रांतपाल भोजराज नाईक निंबाळकर, बिल्डर्स असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष रणधीर भोईटे, लायन्स क्लब, फलटणचे अध्यक्ष प्रसन्न कुलकर्णी, बिल्डर्स असोसिएशनच्या फलटण शाखेचे अध्यक्ष शफिक मोदी, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य मिलिंद नातू यांची प्रमुख उपस्थिती होती.

नागेशकर पुढे म्हणाले, अभियंता दिवस हा भारताच्या जडणघडणीमध्ये अभियंता म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्‍वेश्‍वरय्या यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. फलटण शहराला ऐतिहासिक वारसा लाभला असून सुदैवाने येथील राजघराणे या बाबत जागरूक आहे. हा वारसा जपण्यासाठी त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्यास आपण सदैव तयार असल्याचेही, नागेशकर यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन विश्‍वकर्मा आणि भारतरत्न सर विश्‍वेश्‍वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ला.भोजराज नाईक निंबाळकर यांनी केले. सूत्रसंचालन व पाहुण्यांची ओळख अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापत्य विभाग प्रमुख सौ. धनश्री भोईटे यांनी केले आणि आभार प्राचाय मिलिंद नातू यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!