दैनिक स्थैर्य । दि. २७ सप्टेंबर २०२२ । फलटण । बाळूमामाची भक्ती म्हणजे कोणत्याही प्रकारचे कर्मकांड नाही, अंधश्रद्धा नाही, चालीरीती नाही, अंगात येणे मुळीच नाही, अंगारा-धुपारा नाही, धागा दोरा गंडा देवऋषी लिंबू नारळ करणी नाही. थापणूक नाही, काही नाही. जात्यात जे दळलं जात तेच पीठ आपणाला मिळतं पण भाकरी ताटात आल्यावर तिचे गुणदोष आपल्याला कळतात, आपण त्यातील दोष शोधतो. मग आपला जन्म हा दोष शोधण्यासाठीच आहे का? असे आचरण असणारे आणि त्याप्रमाणे सर्वांनी वागावे अशी अपेक्षा करणारे संत म्हणजे बाळूमामा होत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपली मार्गक्रमणा करावी, असे प्रतिपादन प्रसिद्ध कथाकार प्रा. रविंद्र कोकरे यांनी केले.
कांबळेश्वर ता. फलटण येथे देव म्हणजे काय ? सद्गुरु म्हणजे काय ? बाळूमामा म्हणजे काय? या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते.यावेळी त्यांनी बाळुमामांच्या कार्याचे अनेक पैलू उलगडून दाखवले.त्याचप्रमाणे मनुष्य जन्मात येउन कसे वागावे हे ही त्यांनी ओघवत्या शैलीत सांगीतले.
या व्याख्यानामध्ये कोकरे यांनी अंधश्रद्धेचे वाभाडे काढले, तर कधी हसून, तर कधी रागावून प्रबोधन केले. एकूण काय कोकरे यांचे व्याख्यान हे समाज सुधारक गाडगेबाबा सारखं वाटले.