करोनावर लस तयार होईपर्यंत मास्कचा वापर करावाच लागणार : श्रीमंत रघुनाथराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. 2 : आपल्या तालुक्यातील लोकांची प्रतिकारशक्ती चांगली असल्याने व लोक दक्षता घेत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव आपण रोखू शकलो आहोत. आता मुंबई व पुणे येथून आलेल्यांना सक्तीने गृह विलगीकरण करणे आवश्यक आहे. तालुक्याच्या सुरक्षिततेसाठी अशा नागरिकांनी स्वत:हून योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. मात्र अशा लोकांपैकी जर कोणी प्रशासनाचे नियम मोडत असेल तर गावाने पुढाकार घेवून त्यांना सक्तीने संस्थात्मक विलगीकरणासाठी फलटणला पाठवून द्यावे. आगामी काळात करोना म्हणजेच कोव्हीड 19 या आजारावर लस तयार होईपर्यंत आपल्याला मास्कचा वापर करावाच लागणार आहे. तरी फलटण तालुक्यातील सर्वांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी बोडकेवडी (गिरवी), ता.फलटण येथे ग्रामस्थांशी बोलताना केले.

बोडकेवाडी (गिरवी), ता. फलटण येथे करोनाच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत श्रीमंत रघुनाथराजे मार्गदर्शन करत होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विनायकराव पाटील, चांगदेव खरात, सचिव शंकरराव सोनवलकर, बोडकेवाडी (गिरवी), ता. फलटण येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

यावेळी बोलताना श्रीमंत रघुनाथराजे म्हणाले की,  सध्या कोरोनाच्या विळख्याने संपूर्ण जगाला ग्रासले आहे. संपूर्ण भारतात हा कोरोना थैमान घालत असताना सुदैवाने फलटण तालुक्यातील परिस्थिती काही अंशी समाधानकारक आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात मुंबई – पुणे आदी बाहेरगावांहून आलेल्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळत आहेत. त्यामुळे सर्वांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या परिस्थितीत तालुक्यातील कोणीही आपण एकटे आहोत, असे समजू नका, मी व आमचे कुटुंबीय आपल्या सोबत कायम आहे व राहणार, असेही श्रीमंत रघुनाथराजे यांनी शेवटी सांगितले.

बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर म्हणाले, करोनाची साखळी तयार न होऊ देण्यासाठी गावात सर्वांनी सोशल डिस्टसिंग पाळावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा, वारंवार हात स्वच्छ धुवावेत, पोहायला जाणे टाळावे असे आवाहन करुन आता करोना बरोबर जगायला शिकले पाहिजे.

प्रस्तावित व आभार बोडकेवाडी (गिरवी), ता. फलटण येथील सरपंच व उपसरपंच यांनी मानले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!