दैनिक स्थैर्य | दि. 06 मे 2023 | फलटण | फलटण शहर व तालुक्यात शासनाच्या विविध भागामध्ये विविध अधिकारी हे कार्यरत आहेत. त्यामधील सर्व अधिकारी नाही परंतु काही अधिकारी हे शासनाचे अधिकारी नसून राजकीय पक्षाचे कार्यकर्ते झाले आहेत. आता आगामी काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवूनच सर्व अधिकारी वर्गाने कामकाज करावे; अन्यथा आगामी काळामध्ये जर असे कोणतेही पक्षाचे काम केले तर संबंधित अधिकाऱ्यांकडे स्वतः लक्ष देणार असल्याचे मत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले.
फलटण येथील दरबार हॉल येथे आयोजित आढावा बैठकीत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, अप्पर तहसीलदार दादासाहेब दराडे, गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे – पवार यांच्यासह विविध अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार रणजितसिंह म्हणाले की, फलटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी कोणत्याही सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही पुढार्यांच्या दारामध्ये जावू देवू नका. अधिकारी व शासकीय कर्मचारी यांनी नागरिकांच्या शंकेचे निरसन करणे गरजेचे आहे व योग्य तो मार्ग दाखवणे गरजेचे आहे. कोणत्याही शासकीय कामासाठी नागरिकांना आमदार, खासदार यांच्याकडे जाण्याची आवश्यकता लागता कामा नये.
यावेळी फलटण तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांच्या विविध प्रश्न खासदार रणजितसिंह यांनी ताबडतोब मार्गी लावले.
नोकरीत लागताना शासकीय सेवेत आहे; कोणत्या पुढार्यांच्या सेवक नाही
फलटण तालुक्यातील तलाठी पासून ते अधिकारी यांच्या पर्यंत कोणताही शासकीय अधिकारी हा नोकरीत लागताना शासनाच्या सेवेत आहे तर तो कोणत्याही राजकीय पुढार्यांच्या सेवेत कामाला लागलेला नाही; हे सर्वांनी नीट लक्षात ठेवावे; अन्यथा आगामी काळात अश्या अधिकाऱ्यांकडे बघावे लागेल, असेही खासदार रणजितसिंह यांनी स्पष्ट केले.