योगसाधना ही लोक चळवळ व्हावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २२ जून २०२३ । मुंबई । “बदलती जीवनशैली, ताण-तणाव यावर मात करण्यासाठी योग आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकांनी योग अंगीकारत योगसाधनेला लोक चळवळ बनवावी”, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, ग्राहक संरक्षण, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय, वस्त्रोद्योग मंत्रालय,मुंबई बंदर प्राधिकरण पतंजली योग समिती मुंबई,भारत खाद्य निगम ईसीजीसी लि.सीप्झ-सेझ मुंबई, सीआयसीएफ, यांच्या संयुक्त विद्यमाने आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन गेटवे ऑफ इंडिया येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, मुंबई पोर्ट ट्रस्टचे राजीव जलोटा, टाटा मेमोरियलचे डॉ. अमित गुप्ता, पतंजली समूहाचे अध्यक्ष सुरेश यादव, धर्मवीर शास्त्री तसेच विविध शाळेतील विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, वसुधैव कुटुंबकम् ही योगदिनाची संकल्पना आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशाची कुटुंबातील सदस्याप्रमाणे काळजी घेत आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिवस सुरू होऊन आज ८ वर्ष पूर्ण झाली आहेत. संयुक्त राष्ट्र संघामध्ये योग दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव मान्य करून जगभरातील देशांनी याचा स्वीकार केला आहे. आपल्या देशाने आरोग्याची गुरुकिल्ली संपूर्ण जगाला दिली आहे. योग करा स्वस्थ रहा, योगा करा निरोगी रहा”, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्रधानमंत्री आज आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्र संघाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या देशाच नावं जगाच्या पटलावर नेण्याचं काम करत आहेत. योगाचे फायदे व महत्त्व त्यांनी स्वतःच्या उदाहरणावरून सांगितले. कोविड कालावधीमध्ये बोलण्याचा त्रास होत होता. त्यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मला प्राणायाम करण्याचा सल्ला दिला आणि आज मला व्यवस्थित बोलता येत आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी फिटनेस गुरु सुरेश यादव, यांच्या मार्गदर्शनाखाली योगासने करण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!