फलटणमध्ये आढळला “पिवळ्या पायाचा बट लावा” पक्षी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 20 जुलै 2024 | फलटण | फलटण तालुका व सभोवतालचा परिसर हा विविध वन्यजिव प्रजतींसाठी जैवविविधतेने नटलेला आहे. आत्तापर्यंत फलटण तालुक्यातून खुप दुर्मीळ वन्यजीव प्रजातींच्या नोंदी केल्या गेल्या आहेत. यातच वन्यजीवप्रेमींच्या आनंदात भर पडण्यासारखी बातमी अशी की; फलटण मधे प्रथमच पिवळ्या पायाचा बट लावा (Indian Yellowlegged Button Quail) हा पक्षी Nature And Wildlife Welfare Society, Phaltan चे सदस्य ऋषीकेश शिंदे, बोधीसागर निकाळजे आणि शुभम फडके या वन्यजीव अभ्यासकांना फलटण परिसरात आढळून आला आहे.

पिवळ्या पायाचा बट लावा (Indian Yellowlegged Button Quail) हा पक्षी अंदाजे शहारे लाव्हा एवढा असतो. मादीला गळ्यामागे नारंगी पिंगट रंगाचा रुंद पट्टा असतो. तिचे पाय व चोच पिवळी गर्द असते. मादी गुंडूर लाव्यापेक्षा सावकाश उडते. उडताना तिचा नारंगी तांबूस गळपट्टा,पार्श्वभाग, छाती व खालून पांढरा रंग ठळक दिसतो. नराला गळपट्टी नसते. तो रंगाने फिक्कट असतो. पिवळ्या पायाचा बट लावा स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे. भारतीय उपखंड, निकोबार आणि अंदमान बेटे या ठिकाणी हा पक्षी आढळतो तसेच गवत, झुडपी जंगले आणि शेतीचा प्रदेश या ठिकाणी मोठ्या प्रमाणात याचे वास्तव्य पहायला मिळत आहे.

या वेळी संस्थेच्या वतीने सर्व नागरिकांना असे आवाहन करण्यात येते की; अश्या दुर्मीळ वन्यजिवांचे संरक्षण करणे ही आपली नैतिक जाबबदारी असुन मानवनिर्मित वृक्षतोड, वणवे, अवैध वन्यजीव शिकार थांबवून आपण वृक्षारोपण, परिसर संवर्धन आणि वन्यजिवांना अभय दिले पाहिजे व या निसर्गसाखळीचा समतोल राखण्यास मदत केली पाहिजे तसेच निसर्गसंवर्धनाच्या कार्यात आपणाला सहभाग घ्यावयाचा असल्यास संस्थेशी संपर्क (मोबा.: 7588532023) साधावा.


Back to top button
Don`t copy text!