जिल्ह्याला दोन दिवस यलो अलर्ट

कोयना धरणाचे दरवाजे साडेसहा फुटांनी उचलले


दैनिक स्थैर्य । 29 जुलै 2025 । सातारा । गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसाने नदी, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. त्यातच वेधशाळेने सातारा जिल्ह्याला पुढील दोन दिवस यलो अलर्ट दिला असून, पूरसदृश परिस्थितीत प्रशासनाने उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात आज सकाळपासून पावसाचा जोर थोडासा मंदावला आहे. मात्र, दिवस रात्र पडलेल्या मुसळधार पावसामुळे जलाशयातील पाण्याची आवक 50 हजार क्युसेकपेक्षा अधिक झाली होती. परिणामी, पाणीसाठा नियंत्रणासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे पाच फुटांवरून साडेसहा फुटांपर्यंत उघडून 29 हजार 646 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला, तर पायथा विद्युतगृहाची दोन्ही युनिट सुरू असल्याने त्यातून 2100 क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कोयना नदीमध्ये एकूण 31 हजार 746 क्युसेक विसर्ग होत आहे. धरणाचा एकूण पाणीसाठा 85. 29 टीएमसी झाला आहे, तर नदीतील मोठ्या विसर्गामुळेआज मुळगाव पुलाला पाणी लागले आहे. दोन्ही बाजूला बॅरिकेडस् लावून प्रशासनाने बंदोबस्त सुरू केला आहे.

मुसळधार पावसास सुरुवात झाल्यावर बंद असलेले सहा वक्र दरवाजे शनिवारी सकाळी 11 वाजता चार फुटांनी व सायंकाळी साडेपाच वाजता पुन्हा एक फूट उचलून प्रतिसेकंद 20 हजार 900 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू झाला होता. मात्र, रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत राहिल्याने 24 तासांत धरणामध्ये 4.40 टीएमसी पाण्याची भर पडली आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे साडेसहा फुटांवर नेण्यात आले आहेत. दरवाजे साडेसहा फुटांवर नेल्याने विसर्गात वाढ झाली असून, मध्यरात्रीच्या दरम्यान मुळगाव पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासांत कोयनानगर येथे 84 (2901) मिलिमीटर, नवजाला 131 (3165) मिलिमीटर आणि महाबळेश्वरला 181 (3254) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.जुलै महिन्याच्या सुरुवातीला काही प्रमाणात पावसाची रिपरिप सुरू होती. मात्र, 20 जुलैनंतर जिल्ह्याच्या सर्वदूर भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. नदी, नाल्यांना पाणी वाढू लागल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने ) बहुतांश धरणांतून काल नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

संततधार पावसामुळे भिंत कोसळली

दरम्यान, सातारा शहरासह परिसरात पावसाचा जोर वाढला असून, संततधार पावसामुळे येथील माची पेठेत असणार्‍या एका घराची भिंत कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. याची माहिती मिळाल्यानंतर सातारा पालिकेच्या तसेच आपत्कालीन व्यवस्थापन पथकाने या घराची पाहणी करत संबंधितांना योग्य त्या सूचना करत पंचनामा केला. डोंगर उतारावरील या भागात पावसाचे पाणी साठून राहण्याचे आणि त्यामुळे राडारोडा परिसरातील घरांमध्ये शिरण्याचे प्रकार पावसामुळे सुरू आहेत. अशाच पद्धतीने पावसाचे पाणी आणि राडारोडा घरात, नागरी वस्तीत शिरण्याचे प्रकार होत राहिल्यास येथील आणखी पाच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तविण्यात येत आहे. भिंत पडल्याने झालेल्या नुकसानीचा पंचनामा करत भरपाई देण्यासाठीचा प्रस्ताव पालिकेकडून आगामी काळात जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात येणार आहे


Back to top button
Don`t copy text!