दैनिक स्थैर्य | दि. २ जुलै २०२३ | सातारा |
कासला जाणार्या रस्त्यावर यवतेश्वर घाटात शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मोठी दरड कोसळली. या दरडीतील मोठे दगड घाटातील संरक्षक कठडे तोडून ते दरीत कोसळले.
सातारा-कास रस्त्यावरील यवतेश्वर घाटरस्त्याचे डांबरीकरण करण्यात आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी प्रशस्त झाला आहे. त्यामुळे घाटमार्गे ये-जा करणार्या वाहनांची संख्या वाढली आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर या घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरू होते. सातारा शहराला शनिवारी दिवसभर मुसळधार पावसाने झोडपून काढले. यानंतर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास यवतेश्वर घाटात दरड कोसळून दगड रस्त्यावरून दरीत कोसळले.
या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे हवालदार किरण जगताप, मालोजी चव्हाण यांनी शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमच्या जवानांना सोबत घेऊन तातडीने मदतकार्य हाती घेतले. रस्त्यावर पडलेले मोठे दगड बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. सुदैवाने या घटनेत कोणतीही हानी झाली नाही.