दैनिक स्थैर्य । दि.३० एप्रिल २०२२ । लोणंद । लोणंदचे ग्रामदैवत श्रीकालभैरवनाथ देवाची यात्रेला आज दि. ३० एप्रिलपासून सुरुवात होत आहे. शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या या शिवकालीन मंदिरामधील नाथांची यात्रा गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली होती. मात्र शासनाकडून कोविड निर्बंध शिथिल करण्यात आल्याने यावर्षी यात्रा मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात येणार आहे.
आज शनिवार, दि. ३० एप्रिल रोजी देवांचे नीरा नदी स्नान, त्यानंतर श्रींचा महाभिषेक पोषाख करणे, नंतर नैवेद्य व नारळ वाढविणे, आदी कार्यक्रमानंतर भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे, यामधे प्रथम क्रमांकासाठी ७१ हजार तर द्वितीय क्रमांक ५१ हजार तृतीय क्रमांक ३१ हजार चतुर्थ क्रमांक २१ हजार आणि पाचव्या क्रमांकासाठी ११ हजार अशी बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.
त्यानंतर रात्री श्रींचा छबिना नगर प्रदक्षिणा होणार आहे तर रविवार दि. १ मे रोजी सकाळी ग्रामस्थांच्या करमणुकीसाठी लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे त्यानंतर सायंकाळी ५ वाजता कुस्त्या व रात्री पुन्हा लोकनाट्य तमाशा ठेवण्यात आलेला आहे .सोमवार, दि. २ मे रोजी देवीच्या मानाच्या तुळजापूर येथून आलेल्या सासन काठ्यांचे
जल्लोषात स्वागत करण्यात येणार असून, भाविकांनी या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन श्री काळभैरवनाथ यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तसेच यात्रा कमिटीने केलेल्या नियमावलीचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन केले आहे.