दैनिक स्थैर्य | दि. १७ जानेवारी २०२५ | फलटण |
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाल्यानंतर मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृतीबाबत फार मोठे योगदान आहे. ते स्वत: उत्तम ग्रंथलेखक, रसिक, वाचक, ग्रंथ समीक्षक व ग्रंथ प्रस्तावनाकार होते. त्यांनी अनेक नवोदित, प्रथितयश व ज्येष्ठ-श्रेष्ठ साहित्यिकांना व साहित्य संमेलनांना मदत, प्रोत्साहन दिले होते; परंतु त्यांच्या मराठी साहित्यातील लक्षणीय योगदानाबद्दल उचित साहित्यिक स्मारक यापूर्वीच व्हायला हवे होते. निदान आता तरी नवी दिल्ली येथील ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात याबाबत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या विषयक नियामक समितीने आणि मराठी साहित्यिकांनी, ग्रंथ प्रकाशकांनी एकमुखाने ठराव करून महाराष्ट्र शासनाकडे पाठवावा, अशी मागणी फलटण (जि. सातारा) येथील १४ वर्षांपासून महाराष्ट्रात प्रथमच यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन आयोजित करणारे संयोजक व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या फलटण शाखेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी दिल्लीतील संमेलनाचे स्वागताध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मुख्य कार्यालयास नुकतीच शरद पवार यांनी सदिच्छा भेट दिली होती व त्यांनी साहित्यिकांशी संवादही साधला होता. त्यावेळीही वरील मागणी रविंद्र बेडकिहाळ यांनी या कार्यक्रमात बोलताना केली होती व याबाबतचे निवेदनही त्यांनी शरद पवार यांचेकडे दिले आहे.
‘यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य अकादमी’ स्थापन व्हावी
याबाबत अधिक सविस्तर माहिती देताना रविंद्र बेडकिहाळ यांनी निदर्शनास आणून दिले की, सध्या राज्यात यशवंतराव चव्हाणांच्या नावे मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व राज्य शासनातर्फे नाशिक येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अशी दोन मुख्य स्मरणकार्य केंद्रे आहेत; परंतु त्यांचे साहित्यिक व सांस्कृतिकदृष्ट्या असे भव्य स्मारक त्यांच्या योगदानाला साजेल असे नाही. राज्य शासनाची भाषाविषयक अशी महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मराठी विश्वकोश मंडळ, मराठी भाषा सल्लागार समिती, पु. ल. देशपांडे कला अकादमी अशी मंडळे आहेत. तसेच साहित्य संस्कृती मंडळातर्फे यशवंतराव चव्हाण वाड्मय पुरस्कार आहेत. पण, या सर्वांना मर्यादा आहेत. नवी दिल्ली येथील साहित्य अकादमी वर्षातून एकदाच उत्कृष्ट मराठी साहित्याला ३ अकादमी पुरस्कार देते; परंतु राज्यातील ३२ जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र लक्षात घेतले तर यात व्यापकता येणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य अकादमी झाली तर प्रत्येक जिल्ह्यातील एका उत्कृष्ट साहित्यकृतीला राज्यस्तरीय अकादमी पुरस्कार देवून मोठ्या प्रमाणावर मराठी भाषेला उत्तेजन देता येईल. तसेच मराठी भाषेचा जागतिक दर्जा वाढण्यासाठी उत्तमोत्तम पुरस्कार प्राप्त मराठी साहित्यकृतींचे जगातील प्रमुख भाषांत अनुवाद करणे, तसेच जगातील प्रमुख भाषांतरीत उत्तमोत्तम साहित्यकृतींचे मराठीत अनुवाद करून त्यांचे प्रकाशन करणे, हेही काम अकादमी करू शकेल.
अशी अकादमी झाल्यास सध्या राज्य शासनाच्या मराठी भाषाविषयक उपक्रमांसाठी जी विविध मंडळे, समिती अस्तित्वात आहे त्या सर्वांचे कामकाज या नव्या यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य अकादमीत केंद्रीत करता येईल. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर तो अधिक वाढविण्यासाठी अशी अकादमी खूपच आवश्यक अशी होईल. म्हणून राज्य शासनाने याचा विचार करावा व यावर्षीच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य अकादमीसाठी प्रारंभी रुपये एक हजार कोटीची तरतूद करावी, अशीही मागणी बेडकिहाळ यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री ना. अजित पवार यांचेकडे वरील निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यातील विविध साहित्य संस्था, तसेच साहित्यिक यांनीही अशी अकादमी स्थापन करण्यासाठी राज्य शासनाकडे निवेदने पाठवावीत, असेही आवाहन रविंद्र बेडकिहाळ यांनी केले आहे.