
फलटण येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शनिवार, दि. १० जानेवारी रोजी भव्य ‘शैक्षणिक व व्यवसाय मार्गदर्शन मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), रोबोटिक्स आणि विविध करिअर संधींची माहिती येथे एकाच छताखाली मिळणार आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ०८ जानेवारी : दहावी-बारावीचा टप्पा जवळ आला की विद्यार्थी आणि पालकांसमोर “पुढे काय?” हा यक्षप्रश्न उभा राहतो. सायन्स, आर्ट्स की कॉमर्स? प्रवेश प्रक्रिया कशी असते? शिष्यवृत्ती मिळते का? अशा अनेक प्रश्नांनी पालकांचा गोंधळ उडतो. नेमकी हीच गरज ओळखून श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने एका भव्य ‘यशवंत शैक्षणिक व व्यवसाय मार्गदर्शन मेळाव्या’चे (Career Fair) आयोजन केले आहे. शनिवार, दि. १० जानेवारी रोजी हा उपक्रम पार पडणार असून, यामध्ये ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) सारख्या आधुनिक विषयांसह विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ विद्यार्थ्यांना एकाच छताखाली मार्गदर्शन करणार आहेत.
पालकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी पुढाकार
या उपक्रमाबाबत माहिती देताना महाविद्यालयाच्या प्राचार्या नीलम गायकवाड म्हणाल्या, “सध्याच्या स्पर्धेच्या युगात करिअरच्या वाटा निवडताना विद्यार्थी आणि पालक दोघेही साशंक असतात. प्रवेशासाठी आल्यावर त्यांना एकाच वेळी सर्व क्षेत्रांची सखोल माहिती देणे प्रशासनालाही कठीण जाते. म्हणूनच, विशेषतः ९ वी पासून पुढच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आम्ही हा मेळावा आयोजित केला आहे. येथे त्यांना एकाच ठिकाणी विविध क्षेत्रांतील २५ ते २७ स्टॉल्सच्या माध्यमातून तज्ज्ञांशी थेट संवाद साधता येईल.”
मेळाव्याची ठळक वैशिष्ट्ये:
-
वेळ: सकाळी १०:०० ते सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत.
-
विषय: करिअर गाईडन्स, प्रवेश प्रक्रिया (Admission Process), विविध शिष्यवृत्ती (Scholarships), सीईटी (CET) व नीट (NEET) परीक्षांनंतरच्या संधी.
-
विशेष आकर्षण: भविष्यातील तंत्रज्ञान असलेल्या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) आणि ‘रोबोटिक लॅब’ विषयी सविस्तर माहिती आणि डेमो.
-
शाखा: सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, ॲग्री आणि इतर व्होकेशनल कोर्सेस.
तालुक्यात प्रथमच अशा स्वरूपाचा आणि इतक्या व्यापक स्तरावर हा मेळावा होत आहे. या मेळाव्यात विविध नामांकित शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस आणि मार्गदर्शन केंद्रे सहभागी होणार आहेत.
तरी फलटण शहर व तालुक्यातील विद्यार्थी आणि पालकांनी या मोफत मार्गदर्शनाचा आणि सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्या नीलम गायकवाड आणि उपप्राचार्य प्रकाश घनवट यांनी केले आहे.
