
दि यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक लि., फलटण (शाखा कराड) मधील फसवणूक प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा (EOW), सातारा यांच्याकडून ठेवीदार आणि फसवणूक झालेल्या कर्जदारांना ४ ते ३१ मार्च २०२६ दरम्यान कागदपत्रांसह चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
स्थैर्य, फलटण, दि. २ मार्च : दि यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक लि., फलटण, शाखा कराड या बँकेमध्ये आर्थिक गुंतवणूक केलेल्या ठेवीदारांची मोठी फसवणूक झाल्याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास आता सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) वर्ग करण्यात आला आहे. या अनुषंगाने, फसवणूक झालेल्या सर्व ठेवीदारांना आणि कर्जदारांना त्यांच्या कागदपत्रांसह साताऱ्यात चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
पाच जिल्ह्यांत व्याप्ती; MPID अंतर्गत गुन्हा दाखल
कराड शहर पोलीस ठाण्यात या फसवणूक प्रकरणी गु.नों.क्र. ११६८/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ६१, ३१६(२), ३१६(४), ३१८(४), ३३६(३), ३३८, ३३९, ३४०(२), ३(५) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांचे (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम, १९९९ (MPID) च्या कलम ३ व ४ प्रमाणे गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रऊफ इनामदार हे करीत आहेत. विशेष म्हणजे, तपासादरम्यान या बँकेचे कार्यक्षेत्र केवळ सातारा जिल्ह्यापुरते मर्यादित नसून सोलापूर, पुणे, सांगली आणि रत्नागिरी या जिल्ह्यांतही असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ईओडब्ल्यू (EOW) साताऱ्यात उपस्थित राहण्याचे आवाहन
ज्या गुंतवणूकदारांनी या बँकेच्या कराड शाखेमध्ये आर्थिक व अन्य गुंतवणूक केली आहे आणि ज्या कर्जदारांची फसवणूक झाली आहे, त्यांनी दि. ०४ मार्च २०२६ ते दि. ३१ मार्च २०२६ या कालावधीत सकाळी १०.०० ते दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्यान आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, सातारा येथे खालील आवश्यक कागदपत्रांसह चौकशीकामी स्वतः उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
चौकशीसाठी येताना सोबत आणायची आवश्यक कागदपत्रे:
-
गुंतवणुकीचा पुरावा: मूळ ठेव पावती, प्रमाणपत्र, ज्या बँकेच्या खात्यातून आर्थिक व्यवहार झालेला आहे त्या बँक खात्याचे स्टेटमेंट व अन्य पुरावा.
-
बँक पासबुक: गुंतवणूकदाराचे बँक पासबुकच्या पहिल्या पानाची ठळक व सुस्पष्ट दिसणाऱ्या २ झेरॉक्स प्रती.
-
ओळखपत्र: गुंतवणूकदाराचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड.
-
परताव्याचा पुरावा: गुंतवणूकदारास अंशतः किंवा पूर्णतः परतावा मिळाला असल्यास त्याचा पुरावा (पावती, बँक स्टेटमेंट इ.).
-
कर्जदारांसाठी: फसवणूक झालेल्या कर्जदारांनी त्यांच्याकडील कर्जाबाबतची सर्व कागदपत्रे सोबत आणावीत.
-
झेरॉक्स प्रती: वर नमूद केलेल्या सर्व कागदपत्रांच्या ठळक व सुस्पष्ट दिसणाऱ्या प्रत्येकी २ झेरॉक्स प्रती सोबत आणणे बंधनकारक आहे.
