
सातारा जिल्ह्यातील गाजलेल्या ११२ कोटींच्या यशवंत बँक (फलटण) घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांना आर्थिक गुन्हे शाखेने कराडमधील विंग येथून अटक केली आहे. त्यांना २ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, RBI ने बँकेवरील निर्बंध मे २०२६ पर्यंत वाढवले आहेत.
स्थैर्य, फलटण, दि. 26 फेब्रुवारी : सातारा जिल्ह्यातील आणि राज्यातील सहकार व बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडवून देणाऱ्या फलटण येथील ‘यशवंत बँक घोटाळा’ प्रकरणात अखेर सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. तब्बल ११२ कोटी रुपयांच्या अफरातफर प्रकरणातील मुख्य आरोपी आणि राज्याच्या सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांना मध्यरात्री पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
एकीकडे चरेगावकरांना अटक झाली असतानाच, दुसरीकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बँकेवरील आर्थिक निर्बंध आणखी तीन महिन्यांसाठी वाढवल्याने ठेवीदारांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.
मध्यरात्री ‘विंग’ गावातून मुसक्या आवळल्या
दीर्घकाळापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या चरेगावकरांचा कोणताही थांगपत्ता लागत नव्हता. मात्र, सातारा आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे आणि वेगाने कारवाई करत कराड तालुक्यातील ‘विंग’ या गावातून त्यांना मध्यरात्री ताब्यात घेतले. चरेगावकर यांना कराड न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना २ मार्चपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे. या गैरव्यवहार प्रकरणात यापूर्वीच त्यांचा दत्तक भाऊ विठ्ठल कुलकर्णी यालाही अटक करण्यात आली आहे.
काय आहे ११२ कोटींचा घोटाळा आणि ‘ईडी’ची धाड?
यशवंत बँकेत तब्बल ११२ कोटी रुपयांहून अधिक रकमेची मोठी अफरातफर केल्याचा चरेगावकर यांच्यावर गंभीर आरोप आहे. या प्रकरणी १२ ऑक्टोबर २०२५ रोजी कराड पोलीस ठाण्यात सुमारे ५० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने काही दिवसांपूर्वीच सक्तवसुली संचालनालयाने (ED) चरेगावकरांच्या बंगल्यावर आणि यशवंत बँकेच्या फलटण शाखेवर धाड टाकून मोठी तपासणी केली होती.
RBI कडून बँकेवरील निर्बंधांत ‘मे २०२६’ पर्यंत वाढ
एकीकडे अटकेची कारवाई सुरू असताना, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) यशवंत सहकारी बँक लिमिटेड, फलटण यांच्यावरील निर्बंधांचा कालावधी आणखी वाढवला आहे. बँकेच्या कमकुवत आर्थिक स्थितीमुळे ठेवीदारांना त्यांच्या संपूर्ण ठेवी काढता येत नाहीत (उदा. १०,००० रुपयांची मर्यादा).
-
निर्बंधांचा घटनाक्रम: बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या कलम ३५ अ आणि कलम ५६ अंतर्गत आरबीआयने सुरुवातीला २८ मे २०२५ रोजी सहा महिन्यांसाठी (२९ नोव्हेंबर २०२५ पर्यंत) बँकेवर निर्बंध लादले होते.
-
त्यानंतर मुदतवाढ देऊन ते २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत करण्यात आले.
-
आता सार्वजनिक हितासाठी आरबीआयने या निर्देशांकाच्या कार्यकाळात पुन्हा वाढ केली असून, हे निर्बंध २८ मे २०२६ रोजीच्या व्यवसायाच्या समाप्तीपर्यंत लागू राहतील.
या मुदतवाढीचा अर्थ आरबीआय बँकेच्या आर्थिक स्थितीवर समाधानी आहे असा होत नाही, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे. या दुहेरी कारवाईमुळे आता यशवंत बँक घोटाळ्याचे धागेदोरे आणखी कुठपर्यंत पोहोचतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

