स्थैर्य, दि. २७ : अस्लम काझी नाव घेतल्याबरोबरच कुस्ती शौकिनांच्या डोळ्यासमोर एका लढवैय्या आक्रमक पैलवानाची प्रतिमा उभी राहते मध्यम उंची भारदस्त शरीयष्टी आणि मजबूत बांधा,मैदानभर घुमणारा शड्डूचा आवाज, आक्रमक लढण्याची ढब आणि मजबूत पवित्रा घेऊन क्षणात कुस्तीचा निकाल लावून तेवढ्याच तडफेने विजयी मुद्रेने मैदानात प्रेक्षकांना केलेले अभिवादन. अस्लमच्या सर्वच अदावर कुस्ती शौकिन बेहद फिदा होते. कुस्तीच्या मैदानात अस्लमची कुस्ती म्हणजे कुस्तीशौकिनांच्या द्रुष्टीने तडकाच कारण रटाळ पणा अजिबात नाही आरपार कुस्ती त्यामुळे महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात अस्लमभाईचा एक चाहता वर्ग तयार झाला होता. महाराष्ट्र केसरी म्हणजे महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रातील सर्वोच्च किताब त्यामुळे ही मानाची गदा आपल्या खांद्यावर विराजमान व्हावी याकरिता अनेजण आपले सर्वस्व पणाला लावतात. महाराष्ट्र केसरीचे अधिवेशन सुरू झाले कि सर्वांना उत्सुकता अस्लमच्या कुस्तीची. अस्लमभाऊच्या कुस्तीचे काय झाले? राज्याच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्या चाहत्यांचे फोन धडकायचे. अगदी जातीपातीच्या भींती पाडून अनेकांना तो महाराष्ट्र केसरी व्हावा असे मनापासून वाटायचे त्यामुळे महाराष्ट्र केसरीच्या लढतीत अस्लमच्या पराभवाची अनेकांना हुरहुर लागायची. महाराष्ट्र केसरीच्या गदेचे मोल निश्चित अनमोल आहेच तरी देखील या लढवैय्या मल्लाच्या खांद्यावर तेवढ्याच तोलामोलाच्या आणि मानाच्या 51 गदा विराजमान झाल्या. मुंबई महापौर, कोल्हापूर महापौर त्रिमूर्ती केसरी, अशा प्रतिष्ठेच्या सामन्यात तेवढ्याच ताकादीच्या प्रतिस्पर्ध्याला पराभवाची धूळ चारुन मोठ्या कष्टाने अस्लमने या गदांना गवसणी घातली होती. त्यामुळेच या लढवैय्या मल्लाचा कुस्तीसम्राट किताबाने गौरव करण्यात आला. आजही तेवढ्याच दिमाखाने या किताबाचा आब अस्लमने राखला आहे.
अनेकांना अस्लमचा कुस्तीतील प्रवास स्वप्नवत वाटत असला तरी माढा तालुक्यातील सापटणे गावातून गंगावेशच्या कट्यावरुन अनेक दिग्गजांचे आव्हान त्याने लिलया पेलले अर्थात त्यामागे त्याची प्रचंड कष्ट घेण्याची तयारी होती. परिश्रमापासून तो कधीच मागे हटला नाही. जय पराजयाची कधीही मनात तमा न बाळगणाऱ्या बेडर दिलाच्या अस्लमने अनेक वादळी कुस्त्या केल्या त्याच्या कुस्तीत नेहमी जय पराजयापेक्षा तो लढला कसा याचीच चर्चा अधिक रंगायची.लाँर्डसच्या मैदानात अनेक क्रिकेटपटूंंची शतक व्हावी अशी इच्छा असते. त्यासाठी 50 चेंडूत 90 धावा ठोकणारे शतकासाठी तब्बल 50 चेंडूचा सामना करतात. एखादाच जयसुर्या किंंवा सेहवाग असतो तो 50 धावा किंवा 98 धावावर असला तरी कुठलीच भीती न बाळगता सरळ चौकार षटकाराने शतक साजरे करतो. अगदी तशीच स्थिती अस्लमची आहे. कोणतीही स्पर्धा असुद्या लढण्याची तीच ढब आणि तीच ऐट अगदी गुणांंची आघाडी असली आणि पिछाडी असली तरी बचावात्मक पवित्रा नाहीच त्यामुळे आक्रमक लढून आरपार कुस्ती करण्यावर नेहमीच त्याचा भर राहिला आणि त्याची आक्रमक लढण्याची छबी अनेकांच्या मनावर चांगलीच ठसली होती. त्यामुळे कुस्ती शौकिनांनी अगदी त्याला डोक्यावरच घेतले होते.
खरेतर मी रायगावच्या कारखान्यावर अस्लमची कुस्ती पाहिली 2000 सालचा तो काळ असावा तिसऱ्या फळीत अस्लम काझी, चंद्रहार पाटील, महेंद्र देवकाते अशी तरुण नव्या दमाच्या बिलवा मल्लाची फळी अनेक मैदानात चौखूर उधळत चालली होती. शंकर आण्णांच्या भाषेत जोड्या तोडत मोठा पल्ला गाठण्यासाठी त्यांचा कुस्ती आखाड्यात प्रवास सुरु होता. कुस्ती समजण्याचे ते वय नव्हतेच मुळात मात्र जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र दादा पवार हे अस्लमचे तेव्हा फँन होते. आणि रायगावचे मैदान जोडण्याची जबाबदारी त्यांच्या कडे असायची शंकर आण्णांची खुमासदार आणि रसाळ काँमेट्री कानातून थेट काळजाला भाग भिडायची शिरोळच्या राजू आवळेची हालगी कडाडली कि अंगात भरमायचे नुसता मनात चेव चढायचा आणि मैदानात येतोय अस्लम काझी असा पुकारा व्हायला अवकाश मैदानात एंट्रीलाच खट खट असा शड्डू ठोकता एक बिलवा मल्ल पळतच मैदानात यायचा एंट्रीलाच तो अनेकांची मने जिकायचा हात गोल फिरवत आणि मानेला डावीकडे उजवीकडे हिसडा देत तो थेट प्रतिस्पर्ध्याला भिडायचा शड्डू ठोकून सलामीलाच पटात शिरत प्रतिस्पर्ध्याला संधी न देताच तो कुस्तीचा निकाल लावून मैदान मारून विजयी मुद्रेने माघारी फिरायचा पराभवाची भीती त्याच्या मनाला कधीच शिवली नाही कि विजयाची नशा डोक्यात कधीच शिरली नाही. सदैव पाय जमिनीवर ठेवून मैदानी कुस्तीत अस्लमने भल्याभल्यांना पराभवाचे पाणी पाजून गंगावेशचा दबदबा निर्माण केला.
वास्तविक कोल्हापूरच्या गंगावेशचे नाव कुणाला माहिती नाही असे होईल का कुस्तीच्या सुवर्णकाळात तुफानी ताकदीचे अनेक दिग्गज मल्ल गंगावेश मध्येच घडले डबल महाराष्ट्र केसरी गणपतराव खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रावर आलेले सत्पालचे वादळ याच गंगावेशचे मल्ल रुस्तुम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार मामांनी बेळगाव मुक्कामी परतावून लावले. मधल्या काळात तालमीला आली असेलेली मरगळ प्रशिक्षक विश्वास हरुगुलेंनी अस्लम सारख्या लढवैय्या मल्लावर पैलू पाडून त्याच्या लढण्याला आक्रमकतेची धार देऊन महाराष्ट्रभर गंगावेशचे नाव पुन्हा एकदा लोकांच्या मनावर ठसवण्याचे काम केले. अस्लम नंतर माऊली जमदाडे , सिकंदर शेख यांनी आक्रमतेची आणि आरपार कुस्तीची परंपरा कायम ठेवत गंगावेशचा नावलौकिक जपला आहे.
सांगलीच्या मैदानात कुस्तीतला जादुगार दिलीपसिंगवरचा निर्णायक आयुष्याला कलाटणी विजय असो कि आंतरराष्ट्रीय मल्ल नरसिंगला दिलेला पराभवाचा धक्का असे स्मरणात राहणारे कुस्तीतील अनेक सोनेरी किनार लाभलेले दैदिप्यमान विजयाने त्याच्या कुस्ती कारकिर्दीत चार चाँद लावले. संपूर्ण आयुष्य कुस्तीला वाहिलेल्या आणि लाल मातीचा वसा घेतलेल्या अस्लमने कुस्ती क्षेत्रातून पायउतार झाल्यावरही आजही लालमातीची सेवा अव्याहतपणे सुरुच ठेवली आहे. कुर्डुवाडीला छ शिवाजी महाराज कुस्ती संकुलात आज शेकडो मल्ल त्याच्या मार्गदर्शनाखाली लाल मातीत धडे घेत आहेत. वस्तादाच्या पावलावर पाऊल टाकत कुस्तीसम्राट अस्लम काझीचा पट्टा हाय अशी आरोळी आखाड्यात देणारे मल्ल महाराष्ट्र केसरी ची गदा मिळवून अस्लम काझीचे स्वप्न साकार करतील याबाबत निश्चित खात्री वाटते. अशा लढवैय्या 51 गदेचा मानकरी असलेल्या कुस्तीसम्राटाचा आज वाढदिवस!
अस्लमभाई वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा!
फिरोज मुलाणी, पत्रकार, 9421120356 / 9860105786