कुस्तीपटूंना मानधनासोबत निवृत्तीवेतन, वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करणार – पालकमंत्री चंद्रकातदादा पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ११ जानेवारी २०२३ । पुणे । कुस्तीपटू आपले संपूर्ण आयुष्य कुस्ती खेळासाठी समर्पित करीत असल्याने त्यांना चांगले मानधन  निवृत्तीवेतन, वैद्यकीय सुविधा मिळणे गरजेचे असून यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व संस्कृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कुस्तीमहर्षी स्व.मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी कोथरुड येथे आयोजित 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2022-23 च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, आयोजक तथा माजी महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे, पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष पै. योगेश दोडके आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, राज्य शासनाने राज्यस्तरावर पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूला वर्ग तीनच्या पदावर, राष्ट्रीयस्तरावर पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूला वर्ग दोनच्या पदावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूला वर्ग एकच्या पदावर थेट नियुक्ती देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे  उत्तम नियोजन मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे. या निमित्ताने  मोठे मैदान, आकर्षक बक्षिसे तसेच खेळाडूंसाठीही उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे, असेही श्री. पाटील म्हणाले.

खासदार श्री. तडस म्हणाले, महाराष्ट्राच्या मातीतला खेळ म्हणून कुस्ती खेळाकडे बघितले जाते. कुस्ती खेळाला वैभव प्राप्त व्हावे आणि राज्यातील मल्ल ऑलिम्पिकमध्ये सहभागी होवून पदक जिकंण्याच्यादृष्टीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहेत. गेल्या 65 वर्षांपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.

आमदार बावनकुळे म्हणाले, राज्याला अभिमान वाटावा अशा प्रकारचे आयोजन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने नवीन खेळाडू उदयास येत आहेत. कुस्ती खेळाडूंनी संपूर्ण आयुष्य कुस्ती खेळासाठी समर्पित करीत असतात. राज्यातील कुस्तीपटूंच्या मानधनात वाढ करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. मोहोळ म्हणाले, कुस्ती खेळाला प्रोत्साहन देण्यासोबतच त्यामध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने 10 ते 14 जानेवारी 2023 या कालावधीत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातून सुमारे 950 कुस्तीपटू सहभागी झाले आहेत, असेही ते म्हणाले.

श्री. पाटील यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडचे पै. शेखर लोखंडे आणि जालना जिल्ह्याचे पै. अभिशेख पोरवाल यांच्यामध्ये कुस्ती लावून महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते पै. गोविंद घारगे लिखित ‘महाराष्ट्र केसरी वसा आणि  वारसा’ या पुस्तकाचे अनावरण तसेच राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष स्व. दामोदर टकले यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी माजी खासदार अशोक मोहोळ, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासह नामवंत कुस्तीपटू उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!