
स्थैर्य, फलटण, दि. १५ ऑक्टोबर : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या वतीने कोरेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या सातारा विभागीय कुस्ती स्पर्धेत फलटणच्या नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे. महाविद्यालयाच्या तीन मल्लांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक पटकावला असून, एका खेळाडूने तृतीय क्रमांक मिळवून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
दिनांक १० ऑक्टोबर रोजी कोरेगाव येथील डी. पी. भोसले महाविद्यालयात या स्पर्धा पार पडल्या. शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या सातारा विभागातील विविध महाविद्यालयांतील कुस्तीपटूंनी यामध्ये सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
फ्री स्टाइल कुस्ती प्रकारात गणेश महादेव सोडमिसे (बी.ए. भाग २) आणि शुभम निमगिरे (बी.ए. भाग २) यांनी प्रतिस्पर्धी मल्लांवर मात करत प्रथम क्रमांक मिळवला. त्यांच्या आक्रमक आणि कौशल्यापूर्ण खेळाचे उपस्थितांनी कौतुक केले.
त्याचबरोबर, ग्रीको रोमन या कुस्ती प्रकारात जयंत शेडगे (बी.ए. भाग ३) यानेही सोनेरी कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. तर, जय सचिन कापसे (बी.कॉम. भाग १) याने तृतीय क्रमांक मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले. एकाच स्पर्धेत महाविद्यालयाला मिळालेल्या या यशामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
या घवघवीत यशाबद्दल श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा सविता सूर्यवंशी (बेडके), संस्थेचे मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) आणि नियामक मंडळाचे सदस्य महेंद्र सूर्यवंशी (बेडके) यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. तेजश्री राऊत (पवार), समन्वयक प्रा. राजेंद्र कुलकर्णी, महाविद्यालयाचे क्रीडा विभाग समन्वयक हरीश बेडके तसेच सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनीही विजेत्या खेळाडूंचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.